होमगार्ड हे पोलीस दलाचे महत्त्वाचे सहकारी : अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 9, 2026

होमगार्ड हे पोलीस दलाचे महत्त्वाचे सहकारी : अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे

 होमगार्ड हे पोलीस दलाचे महत्त्वाचे सहकारी : अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे

सोलापूर येथे होमगार्डचे त्रैमासिक संमेलन संपन्न


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड दलाने सेवाभाव, शिस्त आणि संयम राखत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करावा.होमगार्ड हे पोलीस दलाचे महत्त्वाचे सहकारी असून पोलीस प्रशासनाला त्यांचे चांगल्या प्रकारची मदत होते. वारी काळात वारकऱ्यांना 'माऊली' म्हणून संबोधावे. 'माऊली' या शब्दात मोठी ताकद असून त्यातून आपुलकी आणि सेवाभाव व्यक्त होतो, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले.

सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील सभागृहात होमगार्ड दलाचे त्रैमासिक संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील समादेशक अधिकारी, पलटण नायक तसेच महिला व पुरुष होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले. संमेलनात होमगार्डांच्या विविध अडचणी, समस्या आणि सूचनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे म्हणाले की, होमगार्ड हे पोलीस दलाचे महत्त्वाचे सहकारी असून प्रत्येकाने आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडणे आवश्यक आहे. विशेषतः आषाढी यात्रेदरम्यान लाखो वारकरी पंढरपूरकडे येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कोणत्याही वारकऱ्याशी उद्धट वर्तन होणार नाही, याची दक्षता घेत सेवाभावातून बंदोबस्ताचे काम पार पाडावे, असे त्यांनी सांगितले.

भक्ती आणि शक्ती यांच्या बळावर होमगार्डांनी आपली जबाबदारी पार पाडावी. वारकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्याशी आदराने संवाद साधावा. 'माऊली, माऊली' या शब्दांमध्ये मोठी ताकद असून त्यातून विश्वास निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक होमगार्डने यात्राकाळात संयम, शिस्त आणि सेवाभाव जपावा, असे आवाहन त्यांनी केले.

या संमेलनास सोलापूर होमगार्ड कार्यालयाचे केंद्रनायक कोकरे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घाटोळे, चव्हाण, सोलापूर शहर समादेशक अधिकारी इंगळे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील समादेशक अधिकारी, पलटण नायक, महिला व पुरुष होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनात होमगार्ड दलाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी आषाढी यात्रेच्या बंदोबस्ताबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages