औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी संसदेत महाविकास आघाडीचे जोरदार निदर्शने
नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज संसदेच्या मकरद्वारासमोर जोरदार निदर्शने केली.
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांबाबत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षांसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षेच्या संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रभावी आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केली.
तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व शंका तातडीने दूर करून भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, ही सरकारची जबाबदारी आहे, असेही यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्या खासदारांनी व्यक्त केला.
.png)
No comments:
Post a Comment