शिक्षणातून संस्कार जपत देशविकासात योगदान द्या – राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 2, 2026

शिक्षणातून संस्कार जपत देशविकासात योगदान द्या – राजन पाटील

 शिक्षणातून संस्कार जपत देशविकासात योगदान द्या – राजन पाटील


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर उच्च पदे गाठत यश संपादन करावे, मात्र भारतीय संस्कृतीची जपणूक करत आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करण्याचे ध्येय ठेवावे, असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.

स्वेरी इंजिनीअरिंग कॉलेज, पंढरपूर, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर आणि समता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर होते. यावेळी स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे, गटनेते रमेश बारसकर, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप देशमुख, गरड विद्यालयाचे सचिव प्रतापसिंह गरड, मुख्याध्यापक रावसाहेब पाटील, माजी प्राचार्य श्रीधर उन्हाळे, कोरवली येथील अमोगसिद्ध प्रशालेचे अध्यक्ष राजशेखर पाटील, वृक्षमित्र सुदाम वसेकर, एन. बी. जाधव, अमित कोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत समाज व राष्ट्राच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी मोहोळ तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम तीन क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संघर्षमय जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळविण्याचा प्रयत्न केला असून, यापुढे शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार होण्याचे स्वप्न पाहिले आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देतानाच शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages