करमाळा युवासेना तालुकाप्रमुखपदी शंभूराजे फरतडे यांची पुनर्नियुक्ती
करमाळा (कटूसत्य वृत्त):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा करमाळा तालुक्यातील ठाकरे गटाचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या शाहूदादा फरतडे यांचे चिरंजीव शंभूराजे फरतडे यांची पुन्हा एकदा करमाळा युवासेना तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र 'दै. सामना' मधून करण्यात आली.
सन २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्या काळातही फरतडे कुटुंबाने ठाकरे गटाशी निष्ठा कायम ठेवत पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी युवासेना तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शंभूराजे फरतडे यांनी करमाळ्यात भव्य मशाल रॅली काढून शिवसेनेच्या मशाल चिन्हाचे स्वागत केले होते.
तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी संघटन वाढीवर विशेष भर देत अनेक नवीन युवकांना पक्षात सहभागी करून घेतले. रस्ते, वीज, शिक्षण यांसारख्या लोकहिताच्या प्रश्नांवर आंदोलने केली. ऊस वाहतूकदार, शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी लढा उभारला. कर्जमाफी, वीजबिल माफी तसेच ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले.
याशिवाय रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना टोपी वाटप अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पक्ष आणि ठाकरे परिवाराप्रती निष्ठा लक्षात घेऊन शिवसेनेने शंभूराजे फरतडे यांच्यावर पुन्हा एकदा युवासेना तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. या संधीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्या जोमाने संघटन वाढीसाठी काम करणार असल्याचा विश्वास शंभूराजे फरतडे यांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment