सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमण हटवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2026

सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमण हटवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

 सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमण हटवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या होटगी रोड विमानतळ परिसरातील नवी जिंदगी भागात वाढलेल्या अवैध अतिक्रमणांमुळे विमानतळ सुरू होण्याच्या प्रक्रियेला आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विमानतळाच्या धावपट्टी (Runway) आणि सुरक्षा क्षेत्रालगत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे वाढली आहेत. या अतिक्रमणांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांचे उल्लंघन होत असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सोलापूरकरांची अनेक वर्षांची मागणी असलेले विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र विमानतळाच्या फनेल झोनमध्ये आणि धावपट्टीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे आवश्यक मंजुरी मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, विमानतळाच्या राखीव जागेवर झालेल्या अतिक्रमणांमुळे केवळ शासकीय जमिनीचे नुकसान होत नाही, तर भविष्यातील विमानतळ विस्तार आणि नाईट लँडिंगसारख्या सुविधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अवैध अतिक्रमणे तातडीने हटवून विमानतळ विकासाचा मार्ग मोकळा करावा.

सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक प्रगतीसाठी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर सकल हिंदू समाजासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विमानतळ परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages