सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात स्वागत व निरोप समारंभ उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रशासकीय बदली छत्रपती संभाजीनगर येथे तर त्यांच्या जागी प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून प्रमोद पाटील आणि लिपिक प्रदीप गाडे यांची पुणे येथे झाल्याने त्यांच्या जागी हिरालाल पाटील यांनी पदभार घेतल्याने या सर्वांच्या गौरवार्थ सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे, जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सेवक यांच्या उपस्थितीत स्वागत व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मंगळवारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय चळवळीचे नेते तथा ग्रंथमित्र कुंडलिक मोरे होते. विचारपीठावर निरीक्षक संजय ढेरे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाहक साहेबराव शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना कुंडलिक मोरे म्हणाले की, ग्रंथालय चळवळ जर सक्षम करावयाची असेल तर ग्रंथालय अधिकार्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. १९९० पासून ग्रंथालय चळवळ सक्षम करण्यासाठी ग्रंथालय चालक व ग्रंथालय अधिकारी यांचा कसा समन्वय साधला याबाबत उहापोह करून ग्रंथालयांचे अनुदानाचा विषय मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ही मोरे यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी बोलताना सुनिल हुसे यांनी सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चालकांना व चळवळीतील प्रत्येकाला मी कोठेही असलो तरी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्रमोद पाटील यांनी वरीष्ठ अधिकारी, कार्यालयीन सहकारी व ग्रंथालय चालक व चळवळीतील प्रत्येकाच्या सहकार्याने जिल्ह्यात खूप मोठे भरीव कामगिरी करून दाखविणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सुनील हुसे आणि प्रदीप गाडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीच्या बळकटीसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात शासनमान्य ग्रंथालयांशी समन्वय, विविध प्रशासकीय कामकाजाची परिणामकारक अंमलबजावणी आणि ग्रंथालय सेवेच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या पुढील सेवाप्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच नवनियुक्त प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद पाटील आणि हिरालाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रंथालय विकास, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि शासनमान्य ग्रंथालयांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी ग्रंथ मित्र जयंत आराध्ये, प्रकाश शिंदे, धोंडीबा बंडगर, सारिका माडीकर, वृषाली हजारे, दत्ता मोरे, जोतिराम चांगभले, बेडगणूर सर, परबत, महेश कुलकर्णी,दत्ता मोरे, जोतिराम चांगभले, बेडगणूर सर, परबत, महेश कुलकर्णी यांच्यासह ग्रंथालय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल, कर्मचारी, सेवक तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment