पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबवावे - मल्लिनाथ कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- वातावरणातील वाढते तापमान, त्यातून प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरणावर परिणाम होत आहेत. अशा गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. म्हणून लोकोपयोगी संस्थांनी वृक्षारोपणाचे उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
बँक ऑफ बडोदा बँकेस 119 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात बँकेमार्फत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेचे व्यवस्थापक नागनाथ नायर, क्रेडिट ऑफिसर विकास बिडवे उपस्थित होते
पुढे बोलताना ते म्हणाले की, वृक्ष लागवड केल्यास हवा शुद्ध राहते, पावसाचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते आणि जैवविविधतेचे संरक्षण होते.वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही केवळ मोहीम न मानता ती आपल्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. "आज एक वृक्ष लावू, उद्याचे भविष्य घडवू" हा संकल्प करून हरित, स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग झाले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले, आभार मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी मानले कार्यक्रमास रा से यो कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार, मल्लिनाथ स्वामी, मल्लिकार्जुन गायकवाड, गुरुशांत चराटे उपस्थित होते.
चौकट-
एक वृक्ष लावण्याचा संकल्प करावा
वृक्षामुळे सावली, प्राणवायू, फळे, फुले औषधी वनस्पती आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो, त्यामुळे प्रत्येक वर्षी किमान एक तरी वृक्ष लावण्याचा संकल्प केला पाहिजे असे मत बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक नागराज नायर यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment