भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे महापालिकेचा कारभार कोलमडला- खा. प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 17, 2026

भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे महापालिकेचा कारभार कोलमडला- खा. प्रणिती शिंदे

 भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे महापालिकेचा कारभार कोलमडला- खा. प्रणिती शिंदे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

बैठकीस महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध विकासकामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेताना खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे सोलापूर महापालिकेचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून महापालिका भ्रष्टाचाराचे केंद्र बनली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामांमध्ये सातत्याने दिरंगाई होत आहे. अधिकारी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून विकासकामांबाबत बेजबाबदारपणा दाखवत आहेत. लोकांच्या पैशांचा अपव्यय होत असून अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला नाही. सोलापूरच्या विकासाची कामे जाणूनबुजून थांबवली जात असतील, तर ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भैय्या चौक ते मरीआई चौक रेल्वे पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आसरा पुलाच्या कामासाठी मध्यंतरी आसरा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आजपर्यंत प्रत्यक्षात तेथे कोणतेही काम सुरू नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे सांगितल्यावर त्याबाबत लेखी हमी देण्याची मागणी त्यांनी केली.

शहरातील नालेसफाईचे काम अपेक्षित ८० टक्के पूर्ण होणे आवश्यक असताना ते अद्याप पूर्ण झाले नसल्याने यंदाही पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः मुर्गी नाला, पूर्व भागातील नाले, शहारी नाला, कुंभार वेस नाला, गणेश वेस नाला आदी प्रमुख नाल्यांची सफाई अद्याप अपूर्ण असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होऊनही शहरात नियमित दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. डब्ल्यूटीटी (WTP) प्रकल्पासाठी वन विभागाकडून जागा उपलब्ध होत नसतानाही वन विभाग आणि महापालिका यांच्यात अद्याप समन्वय बैठकही न झाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

शुभराय आर्ट गॅलरीच्या कामादरम्यान विहीर लागल्याने उपलब्ध निधी खर्च झाला, मात्र वाढीव निधीसाठी शासनाकडे प्रस्तावच पाठविण्यात आला नाही. परिणामी हे काम अपूर्ण राहिल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली.

पूर्व भागातील तेलगू भवनासाठी आवश्यक असलेली जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी दोन वर्षांनंतरही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही काम सुरू झालेले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सेटलमेंट मैदानाच्या विकासकामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही केवळ सुमारे साठ लाख रुपयांची कामे झाली आहेत. डिझाईन मंजुरीला वर्षभर विलंब झाल्याने उर्वरित अडीच कोटी रुपयांचा निधी पडून आहे. या कामासाठी मुदतवाढही घेतली नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

हद्दवाढ भागातील नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेली ड्रेनेजची कामे निधीअभावी अपूर्ण असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

तसेच रेल्वे अंडरपासच्या देखभालीसाठी महानगरपालिकेकडून आवश्यक रक्कम न भरल्याने ५४ मीटर रोड अंडरपास व रामवाडी अंडरपाससारख्या ठिकाणी महापालिका व रेल्वे प्रशासनातील समन्वयाअभावी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील सर्व अपूर्ण विकासकामांसाठी आवश्यक मुदतवाढ २४ तासांत घेण्यात यावी, तसेच प्रलंबित कामांना तातडीने गती देऊन नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत पायाभूत सुविधा, रेल्वे पूल, आसरा पूल, मरीआई चौक रेल्वे पूल, पाणीपुरवठा, समांतर जलवाहिनी, नालेसफाई, नगरोत्थान योजना, शुभराय आर्ट गॅलरी, सेटलमेंट मैदान, तेलगू भवन, आरोग्य, स्वच्छता आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेवटी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित कोणताही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये. कामांची गती वाढवा, जबाबदारीने काम करा आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने तातडीने निर्णय घ्या असे म्हणाले.

यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages