शिक्षकांना शिकवू द्या' म्हणणाऱ्या सरपंचांना पोलीस कोठडी; दडपशाहीचा आरोप, निषेधाची लाट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

शिक्षकांना शिकवू द्या' म्हणणाऱ्या सरपंचांना पोलीस कोठडी; दडपशाहीचा आरोप, निषेधाची लाट

 शिक्षकांना शिकवू द्या' म्हणणाऱ्या सरपंचांना पोलीस कोठडी; दडपशाहीचा आरोप, निषेधाची लाट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- "शिक्षकांना शिकवू द्या" अशी मागणी करणारे सरपंच मंगेश साबळे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने या प्रकरणावरून राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या कारवाईला विरोधक आणि विविध सामाजिक संघटनांनी "दडपशाहीचे धोरण" संबोधत प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळांमधील शिक्षकांवर वाढणारे अशैक्षणिक कामकाज कमी करून त्यांना विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी पूर्ण वेळ मिळावा, या भूमिकेतून सरपंच मंगेश साबळे यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षकांना अध्यापनासाठी मोकळे करण्याची मागणी करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल विरोधक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवर भूमिका मांडण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी या कारवाईचा निषेध करत, सरकार टीका करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. "प्रश्न सोडविण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांवरच कारवाई करण्याची प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे," अशी प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून या कारवाईमागील कारणांबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा वाढता बोजा, शिक्षण व्यवस्थेतील अडचणी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

सरपंच मंगेश साबळे यांच्यावरील कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages