जिल्हाधिकारी कार्यालयातील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व शाखांतर्गत 90 कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा प्रथमच समुपदेशन पद्धत तसेच संगणकीय प्रणालीचा प्रभावी वापर करून करण्यात आल्या. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे पारदर्शकपणे पूर्ण केल्या असून कर्मचारी वर्गामध्ये समाधान असल्याने कार्यालयीन कामकाजाला गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*90 कर्मचाऱ्यांचे बदली ज्ञापन प्रसिद्ध*
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरच्या आस्थापनेवरील विविध संवर्गाच्या नियतकालिक बदली 2026 च्या अनुषंगाने दि. 18/06/2026 रोजीच्या ज्ञापनाद्वारे महसूल सहाय्यक-16, सहाय्यक महसूल अधिकारी-26, ग्राम महसूल अधिकारी-32, मंडळ अधिकारी-11 व वाहनचालक-5 अशा एकूण 90 कर्मचाऱ्यांचे बदलीचे ज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या 9 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयातील टप्पा क्र. 05 (4) नुसार सर्व विभागातील रिक्त पदे समप्रमाणात भरावीत तसेच अवघड क्षेत्रातील पदे प्राथम्याने भरण्याबाबत निर्देश आहेत.
*दि. 30 जून रोजी समुपदेशन प्रक्रिया*
नागरी सेवा मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत दि. 30.06.2026 रोजी सर्व संवर्गातील अधिकाऱ्यांना समुपदेशनासाठी बोलविण्यात आले. समुपदेशनाद्वारे बदलीची शिफारस करताना कर्मचाऱ्यांचा पसंतीक्रम, प्राधान्यक्रम व यापूर्वी सेवा केलेली ठिकाणे यांचा विचार करून प्रशासनाची निकड लक्षात घेण्यात आली. प्रथम सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे पसंतीक्रम व प्राधान्यक्रमानुसार पद निवडण्याची संधी देण्यात आली. उर्वरित कर्मचाऱ्यांना समानीकरणाअंती उपलब्ध पदे निवडण्याची मुभा देण्यात आली.
*SIR-2026 मधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष निर्देश*
ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांना विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी नेमणूक करण्यात आली आहे, त्यांना कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत.
*प्रथमच संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर*
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील सर्व संवर्गाचे नियतकालिक बदली-2026 चे कामकाज लोकाभिमुख व पारदर्शी पद्धतीने पार पडले. पहिल्यांदाच संगणकीय सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून बदली प्रक्रिया राबविल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाची निकड लक्षात घेऊन कार्यवाही केल्याने सर्वांना पसंतीक्रमानुसार बदली करणे शक्य नसले तरी प्रक्रिया पारदर्शक झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
*बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधान*
समुपदेशन पद्धतीने बदली झाल्याने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार बदली मिळाल्याने काम करण्याचा उत्साह वाढला आहे. कोणत्याही तक्रारीविना बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना तसेच वाहनचालक संघटनेने प्रशासनाचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील नियम 3(1) नुसार पदावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची नियतकालिक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, सामान्य प्रशासन विभागाच्या 9 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयानुसार स्वीकारलेल्या समुपदेशन धोरणानुसार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बदल्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

No comments:
Post a Comment