- नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सर्वांच्या सहकार्यातून सोलापूर जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे करणे शक्य झाले
अधिकारी कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता ठेवून रजाही दिल्या पाहिजेत
जिल्हाधिकारी कठोर राहिले तरच प्रशासन अधिक गतिमान पद्धतीने काम करते
महसूल व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत बदलीनिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार तर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांचे स्वागत
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथे 22 जुलै 2023 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून काम केले. जवळपास या तीन वर्षाच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न, कामे हाताळण्यात आली. येथील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यातून हाती घेतलेली जवळपास सर्व कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी जे प्रेम व सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे. तसेच 3 एप्रिल 2026 रोजी माझी बदली नागपूर येथे झाली असली तरी सोलापूर जिल्हा कायमस्वरूपी माझ्या मनात आहे व राहील, असे भावनिक उद्गार तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी काढले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाल्या निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नियोजन भवन येथील सभागृहात त आयोजित करण्यात आलेला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री संतोषकुमार देशमुख, सुशांत बनसोडे, सुमित शिंदे, सदाशिव पडदुने, विजया पांगारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अन्य धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकार कर्मचारी तसेच प्रशासनातील अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी पदाची यशस्वी कारकीर्द ही येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर अवलंबून असते. नव्याने रुजू झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यातच कोणत्या अधिकाऱ्याकडून कोणत्या प्रकारची
कामे करून घेता येतील याची माहिती होणे गरजेचे असते. तसेच वेळप्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना रजाही देणे आवश्यक असते. परंतु जिल्हाधिकारी यांनी कठोर असणे आवश्यक आहे. कारण जिल्हाधिकारी कठोर राहिले तर प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी अधिक गतीने कामे करतात व त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला लवकर मिळण्यात होऊन शासन व प्रशासनाची चांगली प्रतिमा तयार होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
महसूल प्रशासनाबरोबरच इतर विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट सहकार्यामुळेच आपण सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न, कामे मार्गी लावण्यात यशस्वी झालो असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगून पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर येथील विमान सेवा सुरू करणे, आषाढी वारीचे यशस्वी आयोजन, पूर परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणेने केलेले कामकाज तसेच प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, यामुळे येथे आपण काहीतरी सर्वसामान्यांसाठी काम करू शकलो याचे समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. तसेच नागपूर येथे बदली झाली असली तरी सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी आपण सांगितले तर ते काम करण्यासाठी तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले.
जिल्हाधिकारी एस कार्तिकेयान यावेळी म्हणाले की, मागील दोन महिन्यापासून जिल्हाधिकारी म्हणून आपण सोलापूर मध्ये काम करत असून तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथे जी प्रशासकीय कामकाजाची चौकट निर्माण केली आहे, त्यामुळे कामे करताना कोणतीही अडचण येत नाही. येथील सर्व अधिकारी कर्मचारी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पडतात. तसेच श्री आशीर्वाद सरांनी जे आपले अनुभव मला सांगितलेले आहेत त्या पद्धतीने कामकाज करून सोलापूर जिल्हा विविध विकासकामात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी की कुशल जैन यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कामाचे व कार्यपद्धतीचे कौतुक केले.

.jpeg)

No comments:
Post a Comment