जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बी. नारायणा फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण
"एक झाड माझ्या नावाचं" संकल्पातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बी. नारायणा फाऊंडेशनच्या वतीने परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर बटगिरी होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वृक्षलागवड ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटणारे हरित क्षेत्र यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून प्रत्येक नागरिकाने "एक झाड माझ्या नावाचं" हा संकल्प करून किमान एक तरी वृक्ष लावावा आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वृक्षारोपणातून परिसर हिरवागार करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सोसायटीचे सचिव दिनकर नारायणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. केवळ वृक्षारोपण करून थांबणे पुरेसे नसून लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन, पाणीपुरवठा आणि संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्ष संवर्धनातूनच पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि हरित उपक्रमांबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे सोसायटीतील लहान मुले आणि तरुणांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले.
या प्रसंगी नरसिंग म्हंता, निखिल बटगिरी, संजीव सानी, मनिष बटगिरी, सागर बटगिरी, अनिल कुलकर्णी, रेवप्पा काळे, दिनकर नारायणकर, मल्लिनाथ अचलेरकर, विठ्ठल पवार, कलशेट्टी, सुनिल भैरामडगी, साईनाथ रसोलगीकर, सुनिल शिंदे, ईश्वर लोकरे यांच्यासह सोसायटीतील नागरिक, महिला, युवक आणि बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला असून, भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार बी. नारायणा फाऊंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

No comments:
Post a Comment