अ.भा. मराठी चित्रपट महामंडळासाठी रविवारी मतदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 6, 2026

अ.भा. मराठी चित्रपट महामंडळासाठी रविवारी मतदान

 अ.भा. मराठी चित्रपट महामंडळासाठी रविवारी मतदान

 बदलासाठी मत देण्याचे महामंडळ बचाव अपक्ष संघाचे सभासदांना आवाहन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालक पदाच्या १४ जागांसाठी रविवारी दि. ७ जून रोजी राज्यभर मतदान होणार असून सत्ताधारी पॅनलविरोधात महामंडळ बचाव अपक्ष संघ - तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती आघाडीचे उमेदवार उल्हास नांद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         या निवडणुकीसाठी राज्यभरातील सुमारे ३ हजार ४०० सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोलापुरातील मतदान सरस्वती मंदिर येथे होणार असून शहर व जिल्ह्यातील सुमारे १५० सभासद मतदान करणार आहेत. महामंडळात भ्रष्टाचारमुक्त, तंटामुक्त आणि सभासदकेंद्रित कारभार निर्माण करण्याच्या उद्देशाने 'महामंडळ बचाव अपक्ष संघ - तिसरी आघाडी' स्थापन करण्यात आल्याचे नांद्रे यांनी सांगितले. निवडणुकीनंतरही सभासदांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
         ते म्हणाले, महामंडळातील गेल्या काही वर्षांतील भ्रष्टाचार, अंतर्गत वाद, न्यायालयीन प्रकरणे आणि अपारदर्शक कारभारामुळे सभासदांचा विश्वास कमी झाला आहे. हे चित्र बदलण्यासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि विश्वासार्ह महामंडळ उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महामंडळ हे काही मोजक्या व्यक्तींचे नसून सर्व सभासदांचे आहे, या भावनेतून आम्ही निवडणूक लढवत आहोत.
         या आघाडीत सर्व अपक्ष उमेदवारांचा समावेश असून कोणत्याही मोठ्या पॅनलच्या दबावाखाली न राहता सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व उमेदवार चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत असून सभासदांच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या व्यक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले.
         आघाडीतर्फे अमोल भावे (दिग्दर्शक विभाग), अवधूत जोशी (दिग्दर्शक विभाग), शरद लोणकर (प्रसिद्धी विभाग), मानसिंग कदम (निर्माता विभाग), संतोष शिंदे (अभिनेता विभाग), मनोज मराठे (निर्मिती व्यवस्था विभाग), महादेव शिरोळकर (निर्माता विभाग) आणि उल्हास भालचंद्र नांद्रे (कलादिग्दर्शक विभाग) हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
         या पत्रकार परिषदेला अमोल भावे, महादेव शिरोळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


अपक्ष संघाचा सभासदकेंद्रित वचननामा

महामंडळ बचाव अपक्ष संघाने सभासदांसाठी विविध आश्वासने जाहीर केली आहेत. त्यामध्ये प्रत्येक सभासदाला मतदानाचा हक्क व अद्ययावत सभासद यादी, सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन करणे, तत्काळ सभासद कार्ड वितरण, बोर्ड बैठकींचे थेट प्रक्षेपण, वार्षिक सर्वसाधारण सभेद्वारे थेट संवाद, कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांना जलद न्याय आणि आर्थिक मदत, वैद्यकीय व शैक्षणिक सहाय्य, सर्व सभासदांसाठी विमा योजना, १५ वर्षांहून जुने घरविहीन सभासदांसाठी घरकुल योजना, महाराष्ट्रभर प्रवास सवलत, मानधनवाढीसाठी प्रयत्न, मालिका क्षेत्रातील थकीत देयके वेळेत मिळवून देणे, फिरते सिनेमागृह योजना, वयोवृद्ध कलाकारांच्या पेन्शनमध्ये वाढ तसेच निराधार कलाकारांसाठी ‘कलावंतनगर’ आश्रम संकल्पना यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages