६०० मतदारांची अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी'; खा. धैर्यशील मोहिते-पाटलांचा दावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीमागे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वतोपरी पाठबळ असल्याचा दावा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला आहे.
“आमच्याकडे १६ मतं आहेत का, असा प्रश्न विरोधक विचारत असतील तर मी १६ मतांपासून सुरुवात करतो. मात्र ६०० मतदारांची अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खा. मोहिते-पाटील म्हणाले की, पक्षप्रमुख शरद पवार यांच्या स्पष्ट आदेशानुसार वसंतराव देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. ही लढत केवळ एका उमेदवाराची नसून पुरोगामी विचारांची आहे. महाविकास आघाडी भाजपविरोधात एकसंघपणे मैदानात उतरली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केल्याचा उल्लेख करताना मोहिते-पाटील म्हणाले की, हे आवाहन आम्हाला केवळ माध्यमांतूनच समजले. प्रत्यक्षात कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही किंवा चर्चा केली नाही. संवाद झाला असता तर चित्र वेगळे असू शकले असते, असेही त्यांनी नमूद केले.
लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी, ही हुकूमशाही नाही. आम्ही निवडणूक लढवायची नाही का? असा सवाल उपस्थित केला. पक्षांतर्गत मतभेद असतील तर ते घरच्या घरी सोडवले जातील. घरातील विषय चव्हाट्यावर मांडण्याची आमची परंपरा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वसंतराव देशमुख हे सुधाकरपंत परिचारक आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली घडलेले कार्यकर्ते असल्याचे सांगत, त्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले. आमच्यामागे महाविकास आघाडीतील कोणकोणत्या शक्ती आहेत, हे निकालाच्या दिवशी सर्वांना दिसेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
पक्षाच्या आदेशानेच निवडणुकीच्या रिंगणात
महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख म्हणाले की, पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला असून उमेदवारी दाखल करण्याचे स्पष्ट आदेश मिळाले होते. काही भाजप नेत्यांकडून उमेदवारी मागे घेण्याबाबत संपर्क साधण्यात आला होता. मात्र पक्षाचा आदेश असल्याने उमेदवारी कायम ठेवली. उमेदवारी मागे घेण्याचा अधिकार केवळ वरिष्ठ नेत्यांकडे असून, निवडणुकीत सर्व पक्षांच्या मतदारांकडे मतांचा जोगवा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment