खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सकल मातंग समाज महाराष्ट्र तर्फे सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध खासदारपदी निवड झाल्याबद्दल सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निर्धार मेळाव्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, नामदेव ससाने, राजू आवळे,सुभाष जगताप, विजय अंभोरे, कैलास खंदारे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे, कॉ. गणपत भिसे, डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक शंकर तडाखे, अनिल हातागळे, लसाकम संघटनेचे प्रा. संजय गायकवाड, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले नगरसेवक प्रियदर्शन साठे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पाटोळे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना खासदार डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, “बहुजन समाजातून तसेच कामगार वर्गातून साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. भारतरत्न पुरस्काराच्या निकषांवर विचार केल्यास ही मागणी तथ्यपूर्ण असल्याचे दिसून येते. त्यामुळे मी राज्यसभेत साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार आहे.”
त्याचबरोबर अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत घेऊन या विषयावर त्वरित निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या मेळाव्यास राज्यभरातून आलेले सकल मातंग समाजाचे समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी एस क्षीरसागर, आभार प्रदर्शन किशोर जाधव यांनी मांडले.
.png)
No comments:
Post a Comment