निमगाव येथील सिनियर कॅशियर विलास सुरवसे यांची प्रशासकीय बदली
निमगाव (कटूसत्य वृत्त):- फळवणी (ता. माळशिरस) येथील सुपुत्र तथा महाराष्ट्र ग्रामीण बँक (पूर्वीची विदर्भ कोकण ग्रामीण बँक) निमगाव शाखा येथील सिनियर कॅशियर विलास सोपान सुरवसे यांची पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे प्रशासकीय बदली झाली आहे. या निमित्ताने निमगाव शाखा आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विलास सुरवसे यांच्या बदलीमुळे मात्र निमगाव परिसरातील शेतकऱ्यांमधून आणि बँकेच्या खातेदारांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
निमगाव (म) सारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि कृषिप्रधान गावामध्ये काम करताना विलास सुरवसे यांनी कधीही गट-तट पाहिले नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आपले कामकाज चोख बजावले. शेतकऱ्यांशी सातत्याने जिव्हाळ्याचा संवाद साधत त्यांनी बँकेच्या माध्यमातून गावाच्या विकासाला मोठा हातभार लावला.सुरवसे यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत कौशल्याने काम केले. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य कर्जवाटप करणे, खातेदारांशी उत्तम संवाद ठेवून वेळोवेळी कर्ज वसुली करणे आणि बँकेची सुरक्षा ठेव (डिपॉझिट) वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे एकेकाळी २५ कोटी रुपयांवर गेलेला निमगाव शाखेचा एन.पी.ए. (थकीत कर्ज) थेट ४ कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात त्यांना मोठे यश आले. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली.
विलास सुरवसे यांची बँकेतील नोकरीची सुरुवात 'शिपाई' पदापासून झाली होती. मात्र, आपल्या अंगी असलेली जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी बँकेच्या खात्यांतर्गत परीक्षा दिल्या. या परीक्षांमध्ये यश मिळवून त्यांनी आधी क्लार्क आणि त्यानंतर 'सिनियर कॅशियर' पदापर्यंत मजल मारली. त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
बँकेत प्रशासकीय काम करत असतानाच सुरवसे यांनी बँकेच्या कर्मचारी संघटनांमध्येही आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांची नामांकित संघटना AIBEA (ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन) च्या सोलापूर विभागाचे अध्यक्ष म्हणून सक्षमपणे जबाबदारी सांभाळली. यासोबतच एस.सी./एस.टी. वेलफेअर संघटनेचे सोलापूर रिजनचे 'रिजनल सेक्रेटरी' म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.
सर्वांशी मिळून-मिसळून राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे निमगाव परिसरातील शेतकरी आणि खातेदारांशी त्यांचे एक कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. त्यांच्या बदलीमुळे बँकेचे आणि गावाचे मोठे नुकसान झाल्याची भावना निमगाव येथील ग्रामस्थांनी सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
या सोबतच निमगाव शाखेचे कर्मचारी सुशील दहीटे यांचीही बदली झाल्याने यथोचित सन्मान करून पण निरोप देण्यात आला. याप्रसंगी निमगाव शाखेचे शाखाधिकारी गजानन जाधव, तसेच किरण सोनवणे, मोहन मगर,निनाद पाटील,सचिन भाकरे यांनी विलास सुरवसे यांच्या सोबतचे अनुभव सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
.png)
No comments:
Post a Comment