शेतकऱ्यांच्या लढ्याला जि.प सदस्य नेताजी खंडागळे यांचा पाठिंबा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गोकुळ शुगरकडून शेतकरी बांधवांचे थकीत असलेले सुमारे ३० कोटी रुपये मिळावेत, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित प्रशासनाशी थेट संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
कित्येक दिवसांपासून आपल्या हक्काच्या पैशांसाठी शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर नेताजीभाऊ खंडागळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकरी प्रतिनिधींना आपली भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली.
यावेळी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनीही या प्रश्नात स्वतः लक्ष घालत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत कॉन्फरन्स कॉलद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासनाचे शिष्टमंडळ लवकरच आंदोलनस्थळी भेट देणार असून या प्रकरणी लेखी आश्वासन दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या कष्टाचा प्रत्येक रुपया त्यांना मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडत नेताजीभाऊ खंडागळे यांनी शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी हा लढा अखेरपर्यंत सुरू राहील, अशी ग्वाही दिली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
.png)
No comments:
Post a Comment