छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा लोकोत्तर राजा - डॉ भालचंद्र मुणगेकर
मोडी लिपीतील पहिल्या शिवचरित्राचे प्रकाशन
मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेल्या हजारो वर्षात जगभरात अनेक वीरपुरुष, राजे, अनभिषिक्त सम्राट, राष्ट्रप्रमुख होऊन गेले आहेत, या सर्वांविषयी लिहिताना डॉ हेमंतराजे गायकवाड त्यांच्या पुस्तकात फक्त ग्रेट लिहितात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते "द ग्रेटेस्ट" असे लिहितात. डॉ गायकवाड यांचा जागतिक पातळीवरचा इतिहास सखोल आणि थक्क करणारा असल्यामुळे आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सत्य गवसल्यामुळे ते अशी सप्रमाण तुलना करून एक चांगला पुस्तक आपल्यासमोर आणू शकले. यापूर्वी हे पुस्तक ४ भाषेत आले असले तरी जी मोडी लिपी सध्या प्रचलित नाही अस्तंगत होत असताना आज त्या लिपीत प्रकाशित होत आहे. नैसर्गिक देणगी लाभलेल्या दहा अभ्यासकांनी हे काम स्वहस्ते केले आहे, याचबरोबर जगभरातल्या शिवाजी महाराजांच्या एकंदर साहित्यात पहिल्यांदा त्यांचे चरित्र मोडी लिपी पुस्तकाच्या स्वरूपाने येत आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर या देशात खूप पक्ष, राजकीय नेते, संघटना, इतिहासकार, साहित्यिक, विचारवंत मोठे झाले गायकवाड आणि यांच्यामध्ये हाच फरक आहे की शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व ते विविध भाषेत देशपरदेशात पोहोचवत आहेत आणि हे अभिनंदनीय आहे असे उदगार माजी खासदार आणि कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी काढले.
श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने दादर येथे ३५६ वा शिवराजाभिषेकानिमित्त 'शिवोत्सव सोहळा' आयोजित केला होता, या कार्यक्रमात "शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट" या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री श्री.उदय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि मुक्तपीठचे संपादक श्री. तुळशीदास भोईटे, शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार, मुंबई बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. संदीप सुर्वे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री. रवींद्र मालुसरे हे उपस्थित होते.
डॉ भालचंद्र मुणगेकर पुढे असेही म्हणाले की, शिवजन्मापूर्वी शहाजी राजांनी इतर पातशाह्यांच्या पदरी चाकरी केली, आपल्या मुलाने स्वतःचे परंतु रयतेचे राज्य निर्माण करावे असा प्रयत्न जिजामातांनी त्यांच्या जन्मापासूनच केला.त्यामुळेच शिवाजी महाराज घडले. महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत म्हणून त्यांची शिवजयंती आणि राज्याभिषेक दोनदोनदा साजरा करीत असतो. प्रत्येकाच्या आवडीनुसार करावे. फक्त ५० वर्ष आयुष्य लाभलेल्या राजांचा इतिहास वाचताना लक्षात येते की, त्यांचे कार्य, त्यांची प्रतिभादृष्टी, त्यांची नैतिकता, त्यांची समाजाविषयी असलेली न्यायभूमिका, स्त्रियांच्याविषयी असलेला दृष्टीकोन, सर्व समाजाच्या हिताचा विचार करणारा राजा हे पहिले तर असा लोकोत्तर राजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू राष्ट्र नव्हे तर एत्तद्देशीय लोकांचे राज्य असाच अर्थ आपण घ्यायला हवा. एकीकडे त्यांचा गोब्राम्हण प्रतिपालक असा प्रचार करायचा आणि दुसरीकडे त्यांना रयतेचा राजा असेही म्हणायचे अशी परस्पर छेद देणारी भूमिका ठरणारी आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचणे पुरेसे नाही तर त्यांचा आदर्श जपत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जाणे आहे हे आपले कर्तव्य आहे.
सुरुवातीला संस्थापक डॉ हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेच्या वाटचालीचा प्रवास सांगून माझा पेशा डॉक्टरकीचा परंतु वयाची पंच्याहत्तरी साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजच हे काम माझ्याकडून करवून घेत असावेत असे मला वाटते असे म्हणाले.
पत्रकार तुळशीदास भोईटे आपल्या भाषणात म्हणाले की, स्वराज्याची राजधानी असलेल्या ज्या रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक आजही साजरा केला जातो त्याची पायथ्यापासूनची उंची सुमारे ८२० मीटर (२,७०० फूट) आहे. ३५० वर्षांनंतरही त्याठिकाणचे बांधकाम, पायवाटा, पाण्याची व्यवस्था याचे नियोजन आणि दृष्टीकोन किती चोख होते हे लक्षात येते. त्यांचा इतिहास वाचताना महाराज कसे अष्टवधानी होते. आजच्या काळात घडणाऱ्या घटनांच्याबाबतीत महाराज कसे वागले असते हे अभ्यासायची गरज नाही. देशातील इंधन व्यवस्था, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टचार, स्त्रियांवर होणार अत्याचार, तकलादू परदेशी धोरण, अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी याबाबत महाराज कठोर वागले असते. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका सांगणारे महाराज स्त्रीअत्याचारात रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करतात. राजा कसा असावा तर ३५० वर्षानंतर सुद्धा त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जगभर जयजयकार व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांची ही महानता डॉ गायकवाड वेगवेगळ्या भाषांतून पुस्तके प्रकाशित करून जगभर पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.
पद्मश्री उदय देशपांडे यांनी लहान वयात मुलांच्यावर संस्कार आणि त्यांच्यासाठी मैदान किती महत्वाचे आहे हे शिवाजी महाराजांच्या बालपणाचे दाखले देत एक विडंबन कविता सादर करून विचार व्यक्त केले, सुनील पवार यांनी समितीच्या वतीने रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेकविषयी तर मुंबई बँकेचे महाव्यवस्थापक संदीप सुर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती आणि शेतकऱ्यांविषयी घेतलेली भूमिका आपल्या भाषणात सांगितली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या भूमीत जन्म झाला त्या महाड-पोलादपूर तालुक्याचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान आहे. रामकृष्ण बुटेपाटील यांनी मोडी लिपीचा प्रवास,महत्व आणि हा ग्रंथ कसा परिपूर्ण साकार झाला याविषयी थोडक्यात विचार मांडले.
सुरुवातीला कुमारी ऋतुजा पाटील, कुमार आरंभ गायकवाड, कुमार अरिहंत जाधव यांनी कविभूषण यांची शिवबावनी सादर केली त्याचे गद्य भाषेत वाचन कौशल पाटील यांनी केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक, संकलक आप्पा परब यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी आपल्या खड्या आवाजात शिवबावनी सादर करून या मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
सुप्रसिद्ध मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री श्री.उदय देशपांडे (राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार ), सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक, दुर्गसंवर्धक श्री.श्रमिक गोजमगुंडे( हिरोजी इंदुलकर सन्मान पुरस्कार ), शिवचरित्रांची शेकडो पुस्तके आणि दुर्मिळ नाणी आणि वस्तूंचे संग्राहक श्री. राजा जाधव ( सर रामकृष्ण भांडारकर सन्मान पुरस्कार ), हुतात्मा स्मारक समिती प्रमुख, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री. भाऊ सावंत (रामचंद्रपंत अमात्य सन्मान पुरस्कार), शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे जनसंपर्क प्रमुख श्री. रंजन गावडे ( सुभेदार तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार), मराठाकालीन शस्त्रात्रांचे कलात्मक प्रतिकृती निर्माते रुद्र आर्टचे श्री. सत्यजित वैद्य (वीर बाजीप्रभू देशपांडे सन्मान पुरस्कार ) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पुस्तकाचे मोडी लिपी तज्ज्ञ, लिप्यंतरकार आणि ज्येष्ठ अभ्यासक सर्वश्री रामकृष्ण बुटेपाटील, भाऊ घाडीगावकर, अरविंद कटकधोंड, डॉ. राहुल सारडा, डॉ. तेजस लोखंडे, राम वाघोले, चंद्रशेखर पालव, प्रसाद सुतार, रोहिदास राऊत, तेजस्विनी भावे यांना "बाळाजी आवजी चिटणीस सन्मान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समीर वारेकर आणि राहुल मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन पत्रकार राजन देसाई यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती सुर्वे, दिगंबर चव्हाण, आदित्य अवताडे, गौरव गायकवाड, साक्षी यादव यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:
Post a Comment