आषाढी यात्रेत महिला वारकऱ्यांसाठी प्रथमच स्वतंत्र जर्मन हँगर्स - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 21, 2026

आषाढी यात्रेत महिला वारकऱ्यांसाठी प्रथमच स्वतंत्र जर्मन हँगर्स

 आषाढी यात्रेत महिला वारकऱ्यांसाठी प्रथमच स्वतंत्र जर्मन हँगर्स




पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- आषाढी यात्रेत सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांसाठी यंदा प्रथमच प्रत्येक प्रमुख पालखी तळावर भव्य जर्मन हँगर्स (निवारा शेड) उभारण्यात येणार आहेत. या निवारा केंद्रांमध्ये स्नान, प्रातर्विधी, कपडे बदलण्याची व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य अॅड. माधवी निगडे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्यात आली असून यंदाच्या आषाढी यात्रेपासून ही व्यवस्था कार्यान्वित होणार आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री माधुरी मिसाळ, पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वारकरी महामंडळाचे प्रतिनिधी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, संत तुकाराम महाराज संस्थान आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत अॅड. माधवी निगडे यांनी महिला भाविकांसाठी स्वतंत्र जर्मन हँगर्स उभारण्याचा प्रस्ताव मांडला. पालखी महामार्गावर महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवारा केंद्रे उभारण्यात यावीत, त्यामध्ये कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष, स्नानगृह, स्वच्छतागृहे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. महिला वारकऱ्यांच्या वाढत्या सहभागाचा विचार करता ही सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यंदाच्या आषाढी यात्रा २०२६ मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरम्यान प्रथमच महिला भाविकांसाठी स्वतंत्र निवारा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. आषाढी यात्रा अधिक सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे वारकरी संप्रदाय, महिला भाविक आणि विविध सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages