सोलापूरात २६ ते २८ जूनदरम्यान राज्यस्तरीय ‘योगशास्त्र संगमम्’ परिषद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

सोलापूरात २६ ते २८ जूनदरम्यान राज्यस्तरीय ‘योगशास्त्र संगमम्’ परिषद

 सोलापूरात २६ ते २८ जूनदरम्यान राज्यस्तरीय ‘योगशास्त्र संगमम्’ परिषद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विवेकानंद केंद्र, वयम्, सोलापूर यांच्या वतीने दि. २६, २७ व २८ जून २०२६ या कालावधीत पहिल्या राज्यस्तरीय ‘योगशास्त्र संगमम्’ या त्रिदिवसीय योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रणव नगरी, जुळे सोलापूर येथील विवेकानंद केंद्रात ही परिषद होणार असल्याची माहिती डॉ. शालिनी मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
            विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावर आयोजित होणारी ही पहिलीच योग परिषद आहे.
परिषदेचा मुख्य विषय ‘पातंजल योगसूत्रे’ हा असून योगविषयक संशोधन, अभ्यास, अनुभव आणि आधुनिक काळातील योगाच्या विविध आयामांवर सखोल विचारमंथन घडवून आणणे तसेच योग ही जीवनशैली म्हणून समाजात रुजविणे हा परिषदेमागील प्रमुख उद्देश आहे.
या परिषदेत योगाभ्यास, आसने, प्राणायाम, ध्यान, योगतज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, शैक्षणिक चर्चासत्रे तसेच संशोधनपर शोधनिबंध सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील योग अभ्यासक, संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
          परिषदेचे उद्घाटन २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज (श्रुती सागर आश्रम, फुलगाव, पुणे) यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेत प्रख्यात योग व विचारवंत तज्ज्ञ श्रीराम आगाशे (ठाणे) आणि रवि शर्मा (कन्याकुमारी) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या व्याख्यानांमधून योगाचे तात्त्विक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक पैलू उलगडून सांगितले जाणार आहेत.
       या परिषदेच्या माध्यमातून योग क्षेत्रातील नव्या संकल्पना, संशोधन निष्कर्ष आणि अनुभवांची देवाणघेवाण होणार असून राज्यभरातील योगप्रेमींना एक समान व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. योग क्षेत्राशी संबंधित अभ्यासक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
          या पत्रकार परिषदेस सुहास देशपांडे, संध्या पाटील, दीपक पाटील, नंदकुमार चितापुरे, अरविंद जोशी, अभिराम सराफ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages