लहानपणापासून वाचनाची सवय लावा : डॉ. संध्या रघोजी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच वाचनाची आवड जोपासली पाहिजे. खेळ, संवाद आणि वाचन या तीन गोष्टी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अभ्यासाबरोबरच मनोरंजन आणि विविध छंदही आवश्यक असून उत्तम पुस्तकांचे वाचन केल्याने व्यक्तिमत्त्व घडते. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य आणि सकारात्मक वापर करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यप्रेमी व व्याख्याते डॉ. संध्या रघोजी यांनी केले.
येथील दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील या होत्या. यावेळी प्रिसिजन बुक क्लबचे श्रीधर खेडगीकर, पर्यवेक्षिका सुनिता गवळी, स्मिता हुमनाबादकर, दीपिका जवळगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय वाचन दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील उत्कृष्ट वाचक विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आरुषी कोळी, रेवती बिराजदार, अभय शिंदे, जाई काटकर, ऋतिका तूरूप आणि सुजित रोडगे या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रदान करून डॉ. रघोजी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांचे शब्दभांडार समृद्ध होते. नवीन शब्द, नवीन विचार आणि विविध विषयांची माहिती मिळाल्याने ज्ञानकक्षा विस्तारतात. स्क्रीनवर वाचन करण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तकांचे वाचन मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अधिक फायदेशीर ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी श्रीधर खेडगीकर यांनीही विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त डॉ. संध्या रघोजी यांनी त्यांच्या मातोश्री प्रभा उपलेंचवार यांच्या स्मरणार्थ प्रशालेला पुस्तकांची भेट देऊन वाचन चळवळीला हातभार लावला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मल्लेश पुरवंत यांनी प्रास्ताविक केले. प्रीती कसबे यांनी फलकलेखनाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आरुषी कोळी हिने केले, तर आदिती सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.
राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


No comments:
Post a Comment