विहिरींना संरक्षक कठडे बसवा; अपघात रोखण्यासाठी नागरिकांची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

विहिरींना संरक्षक कठडे बसवा; अपघात रोखण्यासाठी नागरिकांची मागणी

 विहिरींना संरक्षक कठडे बसवा; अपघात रोखण्यासाठी नागरिकांची मागणी

रस्त्यालगतच्या उघड्या विहिरी ठरत आहेत जीवघेण्या; तातडीने सुरक्षात्मक उपाययोजनांची गरज


मोहोळ (कटूसत्य वृत्त) : राज्यासह सोलापूर जिल्ह्यात रस्ते व महामार्गालगत असलेल्या उघड्या विहिरींमुळे वारंवार भीषण अपघात घडत असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून रस्त्यालगतच्या उघड्या विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यापूर्वीही जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत कार, जीप, ट्रॅक्टर, दुचाकी आणि टेम्पोसारखी वाहने रस्त्यालगतच्या विहिरींमध्ये कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. अनेक विहिरींना संरक्षण कठडे, लोखंडी जाळी किंवा इशारा फलक नसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरण तसेच ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्त्यालगत असलेल्या सर्व विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. विहिरींभोवती मजबूत संरक्षण कठडे, लोखंडी जाळी, परावर्तित (रिफ्लेक्टर) इशारा फलक बसविण्यासह धोकादायक ठिकाणी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

चौकट

अपघातानंतर नव्हे, अपघाताआधी उपाय महत्त्वाचे

तज्ज्ञांच्या मते, सुरक्षात्मक उपाययोजनांवर होणारा खर्च हा मानवी जीवापेक्षा निश्चितच कमी आहे. त्यामुळे अपघात घडल्यानंतर मदतकार्य करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. प्रशासनाने तत्परतेने पावले उचलून रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरी सुरक्षित केल्यास भविष्यात अशा दुर्घटना टाळणे शक्य होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages