करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात वादळाचा तडाखा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात वादळाचा तडाखा

 करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात वादळाचा तडाखा

केळी पिकांचे मोठे नुकसान, वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू



करमाळा(कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात शनिवारी (३१ मे) रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या भीषण वादळी वाऱ्याने मोठा हाहाकार माजविला. या वादळामुळे भगतवाडी, गुलमोहरवाडी, पोमलवाडी, खातगाव, केत्तूर, पारेवाडी व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झाले असून सुमारे १५० एकर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी केळीची बाग पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून आले.
माळशिकारे या शेतकऱ्यांच्या केळी पिकाचा दर निश्चित झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी काढणी होणार होती. मात्र, अचानक आलेल्या वादळामुळे त्यांच्या लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरले. अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, या वादळात पोमलवाडी येथील वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगन्नाथ मारुती नवले (वय ७०) आणि शालन मारुती नवले (वय ६५) हे पती-पत्नी शेतात बांधलेल्या घरात राहत होते. वादळ सुरू होण्यापूर्वी दोघेही घरात जेवणासाठी बसले असताना जोरदार वाऱ्यामुळे घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. भिंतीखाली दबून दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. रविवारी सकाळी नातेवाईक शेतातील घरी पोहोचले असता, पडलेल्या भिंतीखाली दबलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा सुरू केला. तसेच मृत दाम्पत्याच्या शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. कृषी व महसूल विभागाकडून पीक नुकसानीचे तसेच जीवितहानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण करमाळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

.....चौकट....
"वादळामुळे झालेली पीकहानी व जीवितहानी अत्यंत दुर्दैवी आहे. माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पाठविण्यात आले. मयतांच्या कुटुंबीयांना तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत लवकर मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी वादळी वारे व अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी."

— शिल्पा ठोकडे (तहसीलदार, करमाळा)

"करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात झालेले पीक नुकसान व जीवितहानी गंभीर बाब आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आणि मयतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages