घरकुल लाभार्थ्यांची वाळूसाठी वणवण; रात्री मात्र अवैध वाळू उपशाला ऊत
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : तालुक्यातील घरकुल योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक वाळू उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनांमधून घरे मंजूर झाली असली तरी वाळूअभावी अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत पडून असून लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
घरकुल लाभार्थ्यांना अधिकृतपणे वाळू मिळविण्यासाठी विविध शासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत आहेत. मात्र प्रत्यक्षात वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामे रखडली आहेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनांचा उद्देश सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा असला तरी वाळूटंचाईमुळे या योजनांच्या अंमलबजावणीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, तालुक्यातील सीना व भोगावती नदीपात्रांसह काही ठिकाणी सायंकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. ट्रॅक्टर, डंपर आणि इतर वाहनांच्या माध्यमातून वाळूची वाहतूक सुरू असल्याचे चित्र असूनही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक नागरिकांनी महसूल विभाग व पोलिस प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अवैध वाळू उपशावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. एका बाजूला घरकुल लाभार्थी वाळूसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अवैध वाळू उपसा तातडीने रोखून घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. "घरकुलासाठी वाळू नाही, पण अवैध उपशासाठी सीना आणि भोगावती नदीपात्रे खुली कशी?" असा संतप्त सवाल लाभार्थी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महसूल, खनिकर्म आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अवैध वाळू उपशास आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
चौकट
वाळू उपशाची माहिती देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष?
भोगावती नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भोयरे गावातील मनसेचे पदाधिकारी आप्पा पवार यांनी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत त्यांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. तसेच सरपंच व पोलिस पाटील यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. मात्र संबंधित ठिकाणी कोणीही पोहोचले नसल्याचा आरोप आप्पा पवार यांनी केला आहे.

No comments:
Post a Comment