मंगळवेढ्यात ३४ व्या पाणी संघर्ष परिषदेची जय्यत तयारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

मंगळवेढ्यात ३४ व्या पाणी संघर्ष परिषदेची जय्यत तयारी

 मंगळवेढ्यात ३४ व्या पाणी संघर्ष परिषदेची जय्यत तयारी

२६ जून रोजी परिषद; दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी घुमणार आवाज



मंगळवेढा (कटूसत्य वृत्त) : कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळग्रस्त भागांच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला बळ देण्यासाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद शुक्रवार, दि. २६ जून रोजी दुपारी १ वाजता मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी दिली.

या परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नायकवडी आहेत. पद्मभूषण क्रांतिवीर स्व. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि संस्थापक अध्यक्ष स्व. आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची पायाभरणी झाली. स्व. आर. आर. पाटील आणि स्व. निळूभाऊ फुले यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या चळवळीने गेली तीन दशके दुष्काळग्रस्त भागांच्या पाण्याच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला आहे.

"पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं" हा संदेश घेऊन ११ जुलै १९९३ रोजी पहिली पाणी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली होती. या लढ्याला आता ३३ वर्षे पूर्ण झाली असून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील जनतेने या चळवळीला मोठे बळ दिले आहे.

या चिवट संघर्षामुळे शासनाला कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करावी लागली. तसेच ११ वर्षांपूर्वी आटपाडी व सांगोला तालुक्यातील बुद्देहाळ तलावात पाणी पोहोचणे हा या लढ्याचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो.

परिषदेत सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, तासगावचे आमदार रोहित आर. आर. पाटील, जतचे माजी आमदार विक्रमदादा सावंत, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, गौरव नायकवडी आणि बाबा महाराज हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय प्रा. डॉ. बाबूराव गुरव, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, आनंदराव पाटील, अॅड. सुभाष पाटील, अॅड. सरफराज बागवान, अॅड. भारत पवार, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. सी. पी. गायकवाड, व्ही. एन. देशमुख, अॅड. बिरप्पा जाधव, तुकाराम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हक्काच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकरी बांधव आणि महिलांनी हजारोंच्या संख्येने परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

चौकट

परिषदेसमोरील प्रमुख मागण्या

  • भीमा, माण आणि कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यात यावेत.

  • मंगळवेढा उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करण्यात यावी.

  • उजनी उजवा कालवा तसेच जत, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यातील अपूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध करून कामे पूर्ण करण्यात यावीत.

  • माण आणि भीमा नदीवर बॅरेजेस उभारण्यात यावेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages