वैराग पोलिसांची तत्परता; आश्रमशाळेतील मुलांना सुखरूप परत पाठवले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

वैराग पोलिसांची तत्परता; आश्रमशाळेतील मुलांना सुखरूप परत पाठवले

वैराग पोलिसांची तत्परता; आश्रमशाळेतील मुलांना सुखरूप परत पाठवले



वैराग (कटूसत्य वृत्त):- २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास काळेगाव येथील पोलीस पाटील रतन घाईतिडक यांनी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना माहिती दिली की, आठ ते नऊ लहान मुले काळेगाव येथून बार्शीकडे चालत जात आहेत.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी तत्काळ डायल ११२ पथकातील पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटकर यांना घटनास्थळी पाठवून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.
तपासणीदरम्यान ही मुले वैराग येथील माता स्वरूपाराणी आश्रम शाळेतील असल्याचे समोर आले. ही मुले सायंकाळी पाचच्या सुमारास शाळेत कोणालाही न सांगता बार्शी येथे त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाली होती.
पोलिसांनी मुलांना विश्वासात घेऊन वैराग पोलीस ठाण्यात आणले. त्यांना खाऊ देऊन आपुलकीने विचारपूस केली असता, पालकांची आठवण येत असल्यामुळे त्यांनी शाळेतून कोणालाही न सांगता निघाल्याचे समजले.
यानंतर आश्रम शाळेतील शिक्षक मनोहर किसन पाटील यांना बोलावून मुलांना त्यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.
या घटनेत वैराग पोलिसांनी दाखविलेली तत्परता, सतर्कता आणि मुलांप्रती दाखवलेली आपुलकी याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages