कुमार खोखो पटूंनी वैभव सूर्यवंशीचा आदर्श घ्यावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

कुमार खोखो पटूंनी वैभव सूर्यवंशीचा आदर्श घ्यावा

 कुमार खोखो पटूंनी वैभव सूर्यवंशीचा आदर्श घ्यावा 



५२व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार दिलीप माने यांचा खेळाडूंना सल्ला 

​सोलापूर, (कटूसत्य वृत्त):क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने इतक्या कमी वयात आपले  सातत्य टिकवून आयपीएल  आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने मोठी कामगिरी करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याप्रमाणे राज्यातून आलेल्या कुमार खो-खो पटूंनी देखील त्याचाच आदर्श घेऊन या स्पर्धेत आपले सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे, असा सल्ला माजी आमदार दिलीप माने यांनी खेळाडूंना दिला.

​महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ व्या कुमार व मुली गटाच्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी) झाले. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे होते. सुरुवातीला किरण स्पोर्ट्सच्या अध्यक्षा अलकाताई राठोड, नागेश बिराजदार, मोहन रजपूत व शिवशंकर राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

​या सोहळ्याला महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव,  खजिनदार गोविंद शर्मा, सहसचिव, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पवन पाटील, डॉ. प्रशांत इनामदार, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, डॉ. बापूसाहेब अडसूळ, नगरसेविका अश्विनी चव्हाण, डॉ. अरुण मनगोळी, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे, अजितकुमार संगवे,  सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सचिव उमाकांत गायकवाड, सहसचिव राजाराम शितोळे, अजित शिंदे आणि संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य अंबादास पांढरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मिसाळ यांनी केले, तर श्रीकृष्ण कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

​राजकारणी आणि खेळाडूंच्या प्रामाणिकपणावर भाष्य

सोलापूरची राष्ट्रीय खो-खो पटू स्नेहा लामकाने हिने उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. या शपथविधीचा संदर्भ देत दिलीप माने पुढे म्हणाले, "खेळाडू हा नेहमी प्रामाणिकपणे आपण घेतलेल्या शपथेचे पालन करतो आणि खेळाडूवृत्ती जपतो. मात्र, आम्ही राजकारणी लोक त्याप्रमाणे आचरण करत नाही," अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

​राज्य स्पर्धांसाठी आता 'रॉयल्टी' नाही

याप्रसंगी महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यापुढे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनासाठी कोणत्याही जिल्हा संघटनेकडून किंवा आयोजक संस्थेकडून 'रॉयल्टी' घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. तसेच, या स्पर्धेतून निवडले जाणारे महाराष्ट्राचे दोन्ही संघ हिमाचल प्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत राज्याची मान उंचावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages