साेलापूर जिल्ह्यात चघळतात रोज कोटींचा मावा; विक्रेत्यांना मुंढेंची धास्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 11, 2026

साेलापूर जिल्ह्यात चघळतात रोज कोटींचा मावा; विक्रेत्यांना मुंढेंची धास्ती

 साेलापूर जिल्ह्यात चघळतात रोज कोटींचा मावा; विक्रेत्यांना मुंढेंची धास्ती




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात गुटखा आणि मावा विक्रीवर बंदी असतानाही सोलापूर जिल्ह्यातील मावा विक्रीचा व्यवसाय अद्यापही तेजीत आहे. जिल्ह्यातील अंदाजे १५ हजार पानटपऱ्यांमधून दररोज एक कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे नऊ अन्न सुरक्षा अधिकारी कारवाईसाठी मैदानात उतरले असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर धाडींचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मावा-गुटख्याची विक्री अद्याप सुरूच असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात १९ जुलै २०१२ पासून गुटखा बंदी लागू आहे. मात्र, कर्नाटकमधून तुकडा सुपारी, सुगंधित तंबाखू आणि अन्य साहित्य आणून मावा तयार केला जात असल्याचे यापूर्वीच्या कारवायांमधून समोर आले आहे. गुटखा बंदीनंतर अनेक पानटपरी चालकांनी 'मावा' या पर्यायाचा आधार घेतला. कालांतराने माव्याचे व्यसन वाढत गेले आणि त्याची मागणीही वाढली. परिणामी, १० रुपयांना मिळणाऱ्या माव्याची किंमत आता १५ ते २० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यातील अनेक पानटपऱ्या शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंतही मावा सहज पोहोचत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी मावा विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई होत नसल्याने या व्यवसायाचे जाळे वाढत गेले. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभर कारवाईची मोहीम तीव्र झाली आहे. त्याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यातही दिसत असला, तरी मावा विक्रीला अद्याप पूर्णतः आळा बसलेला नाही.

१ एप्रिलपासून अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात २८ धाडी टाकल्या आहेत. या कारवाईत २२ गोदामे आणि सात वाहने जप्त करण्यात आली असून, सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे मावा विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असली, तरी काही भागांत अद्याप अडोशाला मावा आणि गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून येते.

कारवाईत वारंवार समोर येणारे भाग

मौलाली चौक, नई जिंदगी, मजरेवाडी, रेल्वे स्टेशन रोड, सात रस्ता परिसर, गुरुनानक चौक, आसरा चौक, विजयपूर रोड, बेगम पेठ पोलिस चौकी परिसर आणि दत्त चौक या भागांत यापूर्वीच्या कारवायांमध्ये मावा विक्रीची प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय तालुक्यांच्या ठिकाणी एसटी स्थानक परिसर, टोलनाका परिसर आणि वर्दळीच्या चौकांमध्येही मावा विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.

तर १० वर्षांपर्यंत कारावास

भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ नुसार, कोणालाही फसवून, जबरदस्तीने किंवा अपायकारक पदार्थ देऊन त्याच्या आरोग्यास धोका निर्माण करणे हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. प्रतिबंधित व आरोग्यास घातक पदार्थांच्या विक्रीविरोधातील कारवाई अधिक कडक करण्याच्या दृष्टीने या तरतुदीकडेही प्रशासनाचे लक्ष आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages