सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी 'बायोमेट्रिक' बंधनकारक
सोलापूर विद्यापीठाचा निर्णय; विद्यापीठाकडून प्राचार्यांना सूचना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि शिस्तीला प्राधान्य देत विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी शासन निर्देशानुसार सर्व महाविद्यालयांमध्ये 'बायोमेट्रिक' प्रणाली कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याच्या सूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दिल्या आहेत.
विद्यापीठाच्या प्रवेश समितीची बैठक कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ऑनलाइन पोर्टलद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती अचूक व पारदर्शक पद्धतीने नोंदविण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी तातडीने बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्याचा नियमित वापर सुरू करावा, अशा सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संपूर्ण नोंद व रेकॉर्ड महाविद्यालयांनी जतन करून ठेवावे. 'बायोमेट्रिक' प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची अचूक माहिती उपलब्ध होणार असून शैक्षणिक प्रक्रियेत अधिक शिस्त निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी व्यापक नियोजन करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार सर्व वर्गखोल्या तसेच प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह शैक्षणिक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी 'एईडीपी' अंतर्गत महाविद्यालयांनी आपल्या परिसरातील उद्योग, व्यवसाय व रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन योग्य विषयांची निवड करावी. तसेच त्यासंदर्भातील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून ते अधिक कौशल्यसंपन्न व रोजगारक्षम बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
परीक्षा प्रक्रियेत सीसीटीव्ही यंत्रणा
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये 'सीसीटीव्ही' यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता तसेच संबंधित 'सीसीटीव्ही'चे 'आयपी ॲड्रेस' विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाला सर्व परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीचे थेट निरीक्षण करता येणार आहे. 'सीसीटीव्ही'मुळे कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा बसण्याबरोबरच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढून गुणवत्तावृद्धीस मदत होईल, असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment