घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 30, 2026

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

 घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

गुन्हे शाखेची धडक कारवाई; दोन सराईत चोरांसह चोरीचा माल खरेदी करणारे सराफ अटकेत, १०.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर (कटूसत्य वृत्त) : विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवस्तीत बंद घर फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्य घरफोड्या टोळीचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सराईत चोरांसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या सराफांनाही अटक करण्यात आली असून, एकूण १० लाख ६३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २५ मेच्या रात्री ते २६ मेच्या पहाटे दरम्यान जुळे सोलापूर येथील म्हेत्रे टॉवर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातून २१७ ग्रॅम सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने घटनास्थळ व परिसरातील तब्बल ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील हडपसर येथे छापा टाकून मुख्य आरोपी सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३५) याला अटक केली. चौकशीत त्याने साथीदार मंजित कुमार (रा. उत्तर प्रदेश) याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी १५६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले साहित्य आणि इतर मिळून १० लाख ६३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोरीचा माल खरेदी करणारे सराफही जाळ्यात

तपासादरम्यान आरोपी सुरजितसिंग याने चोरीतील दागिने लक्ष्मण गणेश रणशिंग (वय २७) व संतोष विलास साबळे (वय २९, दोघेही रा. हडपसर, पुणे) यांना विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच उर्वरित सोने खरेदी करणारा अब्दुल वहिद अब्दुलकादर शेख (वय ४५, रा. रविवार पेठ, पुणे, मूळ रा. पश्चिम बंगाल) यालाही अटक करण्यात आली. दागिने चोरीचे असल्याची माहिती असूनही ते खरेदी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली जावेद जमादार, विनोद रजपूत, इम्रान जमादार, धीरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंडे, वसीम शेख, काशिनाथ वाघे, आबा सावळे, सैपन सय्यद, विठ्ठल यलमार, राजू मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, बापू साठे, महेश शिंदे, अनिल जाधव, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे आणि मारुती घोरपडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages