शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
महामार्ग विरोधी समितीचा करकंब येथे मेळावा; एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार
करकंब (कटूसत्य वृत्त) : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध अधिक तीव्र होत असून, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करकंब येथे झालेल्या एल्गार मेळाव्यात महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. महामार्ग विरोधी समितीच्या वतीने आयोजित या मेळाव्यात शेतकरी, महिला व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी उपस्थितांनी शक्तिपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील ऊस, द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला आदी बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त केली. द्राक्ष, डाळिंब व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या बागा या महामार्गामुळे संपादित होणार असल्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मेळाव्यास विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, कॉम्रेड गिरीश फोंडे, के. के. पाटील, विजय रणदिवे, शिवाजी पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी "गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नकोच", "एक इंचही जमीन देणार नाही" अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
वक्त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातून यापूर्वीच पुणे–हैदराबाद, रत्नागिरी–नागपूर, दोन पालखी महामार्ग तसेच नाशिक–अक्कलकोट महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. सोलापूर हे राज्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने केंद्रस्थानी असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी दर्जेदार रस्त्यांचे जाळे आधीच उपलब्ध आहे. त्यामुळे नव्याने शक्तिपीठ महामार्ग उभारण्याची आवश्यकता नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
महामार्गाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अन्यथा शेतकरी आणखी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही मेळाव्यात देण्यात आला.
No comments:
Post a Comment