नीलकंठ बँक देणार १२ टक्के लाभांश
२९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; १.८६ कोटींचा निव्वळ नफा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : नीलकंठ को-ऑपरेटिव्ह बँक लि., सोलापूरने मार्च २०२६ अखेर १ कोटी ८६ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवित भक्कम आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे. यंदा सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन सीए धनराज नोगजा यांनी दिली.
बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी माहेश्वरी सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडली. यावेळी व्हाईस चेअरमन पद्मा भुतडा, संचालक रमेश राठी, चंद्रकांत तापडिया, प्रदीपकुमार शिंगवी, जमनादास भुतडा, कौस्तुभ करवा, शरद कालाणी, सचिन कोठारी, अभिजित चिल्लाळ, किरण शेरखाने, नंदकुमार भोसले, सीएस नंदा भट्टड, तज्ज्ञ संचालक सीए आनंद झंवर, अॅड. महेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी बँकेचे संस्थापक दिवंगत विश्वनाथ करवा यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्हाईस चेअरमन पद्मा भुतडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद बलदवा यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. त्यास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. तज्ज्ञ संचालक सीए आनंद झंवर यांनी ताळेबंद सादर केला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना चेअरमन सीए धनराज नोगजा यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. मागील वर्षभरातील विविध आर्थिक निर्देशकांमध्ये बँकेने उल्लेखनीय वाढ नोंदविल्याचे सांगत सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी विजयकुमार शाबादीया यांनी मार्गदर्शन केले. तसेच बँकेच्या गुणवंत सभासदांच्या पाल्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अन्नपूर्णा सामलेटी यांनी केले, तर आभार संचालक चंद्रकांत तापडिया यांनी मानले. सभेला बँकेचे सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँकेची आर्थिक कामगिरी एका नजरेत :
निव्वळ नफा : १.८६ कोटी रुपये
ठेवी : २११.५९ कोटी रुपये
खेळते भांडवल : २४७.१३ कोटी रुपये
भागभांडवल : ५.३६ कोटी रुपये
कर्जवाटप : १२६.८४ कोटी रुपये
निधी : १५.४९ कोटी रुपये
गुंतवणूक : ८७.१३ कोटी रुपये
एनपीए : ०.०० टक्के
ऑडिट वर्ग : 'अ'
No comments:
Post a Comment