निर्मल वारी-हरित वारी अभियानात पर्यावरण कार्याचा गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने आयोजित 'निर्मल वारी-हरित वारी' अभियानात सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांना पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'वृक्षस्नेही' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. शिवाजीराव महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देहू परिसरात मोठ्या प्रमाणावर वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत हजारो वडाच्या रोपांची लागवड करून हरित महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींचा 'वृक्षस्नेही' म्हणून गौरव करण्यात आला. त्यामध्ये उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा समावेश होता. त्यांना सन्मानपत्र आणि संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा भेट देऊन गौरविण्यात आले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमास नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर, देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सारिका शेळके तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment