देवळालीला वादळी वाऱ्याचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, पिकांचे मोठे नुकसान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

देवळालीला वादळी वाऱ्याचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, पिकांचे मोठे नुकसान

 देवळालीला वादळी वाऱ्याचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, पिकांचे मोठे नुकसान

पीडितांना तातडीने मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी



करमाळा (कटूसत्य वृत्त) : करमाळा तालुक्यातील देवळाली येथे रविवारी (दि. ७) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान केले. वादळाच्या तडाख्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून शेती पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वारे वाहू लागले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, रोहिदास वाघ यांच्या घरावरील पत्रे उडून दूरवर जाऊन पडली. या घटनेत लक्ष्मी रोहिदास वाघ आणि अनुष्का वाघ या दोघींना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय संजय दामोदरे, दादा गाडे, प्रकाश दामोदरे आणि कल्याण कानगुडे यांच्या घरांवरील पत्रेही वाऱ्यामुळे उडून गेली. त्यामुळे या कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. कल्याण कानगुडे यांच्या घरावरील पत्रे तब्बल शंभर फूट दूर जाऊन पडल्याने त्यांचे विशेष नुकसान झाले असून त्यांना रात्रभर दुसरीकडे आसरा घ्यावा लागला.

गावातील बसस्थानक परिसरातही वादळाचा मोठा प्रभाव दिसून आला. अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेती क्षेत्रालाही बसला आहे. काढणीस आलेली पिके जमीनदोस्त झाली असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

वादळामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत तसेच बाधित कुटुंबे आणि शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करावी, अशी मागणी देवळाली ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages