दुष्काळातही वसंत बहरेल'; सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत मोहिते पाटलांचा विजयाचा विश्वास - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 19, 2026

दुष्काळातही वसंत बहरेल'; सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत मोहिते पाटलांचा विजयाचा विश्वास

दुष्काळातही वसंत बहरेल'; सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत मोहिते पाटलांचा विजयाचा विश्वास



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सोलापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या विजयाचा दावा करत, निवडणुकीत अनेक अप्रत्यक्ष घटक आपल्या बाजूने असल्याचे सूचक वक्तव्य केले.

16 मतांपासून सुरुवात, पण विजय आमचाच – मोहिते पाटील

पत्रकार परिषदेत बोलताना धर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, या निवडणुकीत आम्ही सुरूवातीला केवळ 16 मतांपासून सुरूवात केली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. 22 तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतर आमचा विजय निश्चित होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जिल्ह्यातील अनेक अदृश्य शक्तींनी आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे या दुष्काळात देखील वसंत बहरेल हे तुम्हाला निकालाच्या दिवशी दिसेल. के कोण आहेत, याबाबत त्यांनी अधिक भाष्य टाळले.

कॅमेरा असलेल्या गॉगलवरून आक्षेप

मतदान प्रक्रियेदरम्यान घडलेल्या एका घटनेचा देखील मोहिते पाटील यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, एक मतदार कॅमेरा बसवलेला गॉगल घालून मतदान केंद्रावर आले होते. मतदान गुप्त पद्धतीने व्हावे, हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही त्यावर आक्षेप घेतला. मतदानाचा फोटो किंवा व्हिडिओ काढून तो काही नेत्यांना दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता होती. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कॅमेरा असलेला गॉगल देखील उपस्थितांना दाखवला. मतदान प्रक्रियेची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी हा आक्षेप घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम सातपुतेंवर निशाणा

माजी आमदार राम सातपुते यांनी केलेल्या टीकेला देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. काही लोकांना आपल्या मालकाजवळ स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करावी लागतात. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. उत्तम जानकर यांच्याशी संबंधित राजकीय चर्चांवर बोलताना ते म्हणाले, तो आमच्या घरातील विषय आहे. तो आम्ही घरातच मिटवू. त्याबाबत बाहेर चर्चा करण्याची गरज नाही.

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीची आकडेवारी

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत एकूण 616 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात एक जिल्हा परिषद, एक महानगरपालिका आणि 17 नगरपरिषद व नगरपंचायती अशा एकूण 19 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 544 सदस्य मतदार आहेत. याशिवाय 49 नामनिर्देशित सदस्य आणि 23 अध्यक्ष यांचा समावेश होऊन मतदारसंख्या 616 वर पोहोचते.

या निवडणुकीसाठी सुरूवातीला 15 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. मात्र छाननी आणि माघारीनंतर अखेर दोन उमेदवार मैदानात राहिले आहेत. मतदानासाठी जिल्ह्यात सहा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून कुर्डूवाडी येथे 80, उत्तर सोलापूरमध्ये 188, दक्षिण सोलापूरमध्ये 89, पंढरपूरमध्ये 100, मंगळवेढा येथे 62 आणि अकलूज येथे 97 मतदार मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर तहसीलदार केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले असून कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

22 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून वसंतराव देशमुख की सत्ताधारी आघाडीचा उमेदवार, याचा फैसला मतपेटीतून होणार आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages