माऊलीच्या अश्वाचे २७ जून रोजी प्रस्थान, परंपरेनुसार नियोजित ठिकाणी मुक्काम
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करण्यासाठी शितोळे अंकली येथून माऊलींच्या मानाचे अश्व २७ जून रोजी शितोळे सरकार राजवाड्यातून प्रस्थान करणार आहे. त्यानुसार सर्व तयारी पूर्णत्वास आली आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांनी दिली आहे.अश्वांचा मान परंपरागत असून परंपरेनुसार ठरवून दिलेल्या नियोजित ठिकाणी माऊलींच्या आश्वाचे मुक्काम होणार आहे. २७ जून रोजी गावच्या वेशीकडे प्रस्थान झाल्यानंतर दुपारी १२ वाजता अंकली ते आळंदी प्रवास सुरू होईल. २७ जून रोजी अंकलीतून प्रस्थान केल्यानंतर पहिला मुक्काम मिरज, २८ रोजी सांगलवाडी, २९ रोजी इश्वरपूर पेठनाका, ३० रोजी वहागाव, दि. १ जुलै रोजी भरतगाव, २ रोजी भुईंज, ३ रोजी सारोळा, ४ रोजी शिंदेवाडी, ५ व ६ रोजी पुणे व ७ जून रोजी आळंदी येथे माऊलींच्या अश्वाचा मुक्काम असणार आहे.अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ कि. मी. चा प्रवास अश्वांसह स्वार आणि त्यांचे पथक यांचा पायी असणार आहे. रोज साधारण
३० कि. मी. चा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला जाणार आहे. मुक्कामाची ठिकाणे परंपरेनुसार ठरलेली असतात. वारी काळात दुपारच्या मुक्काम ठिकाणी माऊलींना आरतीनंतर पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. हा मान परंपरेनुसार शितोळे सरकारांकडे असून, या महानैवेद्याच्या साहित्याचा ट्रॅक्टरही अंकलीहून याच दिवशी निघणार आहे. यावर्षी परंपरेनुसार नियोजन करण्यात आले आहे.आळंदी येथे आगमन झाल्यानंतर दिंडीचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार व ज्ञानेश्वर माऊली देवस्थानच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी माऊलींचे अश्व गाभार्यात जाऊन माउलींच्या पादुकांचे दर्शन घेणार आहेत. आषाढी एकादशी झाल्यावर माऊलीचा परतीचा प्रवास चालू होईल तेव्हा पंढरपूरच्या वेशीपर्यंत हे अश्व निरोप देण्यासाठी जातील व तिथून मग ते अंकलीकडे मार्गस्थ होतात, असे महादजीराजे शितोळे सरकार यांनी सांगीतले.
चौकटीत :
१८३२ मध्ये हैबतबाबांनी माऊलींचा सोहळा सुरू केला, तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार रोज शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीस स्वतः किंवा प्रतिनिधींची उपस्थिती, वारीतील न्यायनिवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे हे रीतिरिवाज कायम आहेत.
सोहळ्यात रोज पहाटे ४ वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात व त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो व त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो व तिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो. सोहळ्यात व इतर वेळी कधीही माऊली अश्वावर कोणीही बसत नाही. त्यावर स्वतः माऊली स्वार असतात.
महादजीराजे शितोळे सरकार
(अंकलीकर)

No comments:
Post a Comment