साहित्य हे संवेदना जागृत करणारे प्रभावी माध्यम- प्रा. डॉ. वामन जाधव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

साहित्य हे संवेदना जागृत करणारे प्रभावी माध्यम- प्रा. डॉ. वामन जाधव

 साहित्य हे संवेदना जागृत करणारे प्रभावी माध्यम- प्रा. डॉ. वामन जाधव




अकलूज (कटूसत्य वृत्त):- साहित्य हे केवळ शब्दांचे संकलन नसून ते माणसाच्या अंतर्मनातील संवेदना जागृत करणारे आणि समाजाला विचारप्रवृत्त करणारे प्रभावी माध्यम आहे. साहित्यामुळे माणसामध्ये विचारांची परिपक्वता निर्माण होते, समाजातील दुःख, वेदना, संघर्ष आणि आनंद यांची जाणीव अधिक तीव्रतेने होते. माणुसकीची जपणूक, सामाजिक बांधिलकी आणि मूल्यांची रुजवण साहित्याच्या माध्यमातून घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक तथा विचारवंत प्रा. डॉ. वामन जाधव यांनी केले.

वेळापूर येथील इंद्रनील मंगल कार्यालयात प्रा. डॉ. भारत गायकवाड यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या ‘अंतरीचे शब्दतरंग’ या नव्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम अत्यंत उत्साही, साहित्यिक आणि भावनाप्रधान वातावरणात संपन्न झाला. साहित्य, संस्कृती आणि वैचारिक चिंतनाचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, शिक्षक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि रसिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. वामन जाधव होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी साहित्याची समाजपरिवर्तनातील भूमिका अधोरेखित करताना, लेखकाने समाजातील वास्तव, मानवी भावना आणि मूल्यांचा सातत्याने वेध घेत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. भारत गायकवाड यांचे साहित्य हे संवेदनशील मनाचे प्रतिबिंब असून त्यांच्या लेखणीतून समाजमनाचे विविध पैलू प्रभावीपणे व्यक्त झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश जडे, ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत पवार, डॉ. पांडुरंग नलवडे, प्रा. अशोक गायकवाड, दादासाहेब खरात, प्रा. डॉ. गोरख साठे, प्रा. डॉ. औदुंबर जाधव, प्रा. शिवाजीराव वाघमारे, रवी वसंत सोनार, प्रा. सुरेखा भालेराव,माजी प्राचार्य जे जे जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने-देशमुख, युवा नेते जीवन जानकर, आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रा. डॉ. भारत गायकवाड यांच्या दीर्घ साहित्यिक प्रवासाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ग्रामीण जीवन, मानवी भावना, सामाजिक वास्तव आणि वैचारिक संवेदनशीलता यांचा वेध घेणाऱ्या त्यांच्या साहित्यनिर्मितीचे विशेष कौतुक करण्यात आले. ‘अंतरीचे शब्दतरंग’ हा काव्यसंग्रह वाचकांच्या मनाला स्पर्श करणारा आणि विचारांच्या नव्या क्षितिजांकडे नेणारा ठरेल, असा विश्वासही अनेक वक्त्यांनी व्यक्त केला.
प्रा. डॉ. भारत गायकवाड यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘अंतरीचे शब्दतरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले. पुस्तक प्रकाशनाचा क्षण उपस्थित साहित्यप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.
यावेळी आपल्या मनोगतात प्रा. डॉ. भारत गायकवाड यांनी कुटुंबीय, मित्रपरिवार, साहित्यप्रेमी आणि सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले. “माझ्या साहित्यप्रवासात कुटुंबाची साथ, मित्रांचे प्रोत्साहन आणि वाचकांचे प्रेम हेच माझे खरे बळ राहिले आहे. या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच ‘अंतरीचे शब्दतरंग’ हा काव्यसंग्रह आज वाचकांसमोर सादर करू शकलो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमास वेळापूर परिसरातील साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages