गजीनृत्य अन् ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

गजीनृत्य अन् ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

 गजीनृत्य अन् ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खास धनगरी गजीनृत्य अन् ढोल-ताशांच्या निनादात, कैताळाच्या गजरात आणि पिवळ्या फेट्यांच्या साक्षीने निघालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची भव्य शोभायात्रा म्हणजे अहिल्यादेवींच्या कार्याला वाहिलेला एक मानाचा मुजरा ठरला. अहिल्यादेवी, मल्हारी मार्तंड, म्हाळसा आणि बानू यांच्या रूपातील अत्यंत प्रभावी जिवंत देखाव्यांनी सोलापूर शहरवाशीयांचे लक्ष वेधून घेतले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती सप्ताह सांगतानिमित्त शनिवारी नॉर्थ कोट मैदान पासून ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य आणि दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेचा शुभारंभ पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आला.  प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. आयेशा रंगरेज, अधिसभा सदस्य रोहिणी तडवळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे आदींसह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या ढोल-ताशा आणि कैताळाच्या गजराने शोभायात्रेला सुरुवात झाली. ढोल-ताशा पथकांनी ताल, कौशल्य आणि उर्जा यांच्या संगमातून वातावरण भारून टाकले. अहिल्यादेवींच्या वेशातील कलाकाराने साधी पण तेजस्वी वेशभूषा, कपाळावरील कुंकू, हातातील शिवपिंड आणि चेहऱ्यावरचे सात्विक भाव यामुळे प्रत्यक्ष अहिल्यादेवींचे भासमान रूप साकारले.
मल्हारी मार्तंड, म्हाळसा आणि बानू या देखाव्यांनीही विशेष दाद मिळवली. हातात खड्ग आणि भंडारा घेऊन घोड्यावर स्वार झालेला मल्हारी मार्तंडांचा देखावा पराक्रमाची साक्ष देत होता. म्हाळसा आणि बानू यांच्या पारंपरिक वेशभूषा, अलंकार आणि भावभिनयांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अहिल्यादेवींच्या श्रद्धास्थानांपैकी खंडोबा मंदिराचा त्यांनी केलेला जीर्णोद्धार लक्षात घेता हे देखावे त्यांच्या धार्मिक कार्याची सार्थ कल्पना उपस्थितांपर्यंत पोहोचवत होते.
शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी डोक्यावर परिधान केलेले पिवळे फेटे आकर्षणाचा वेगळाच रंग भरत होते. अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या हजारो पिवळ्या फेट्यांमुळे शोभायात्रेला भव्यता आणि एकसंधतेची आगळी ओळख प्राप्त झाली. उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात आणि उपाध्यक्ष कांचन आघाव यांच्या समितीने शोभायात्रेचे उत्कृष्ट नियोजन केले. संपूर्ण शोभायत्रेचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages