माढा (कटूसत्य वृत्त) :- उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेले माढ्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून येत्या काही महिन्यांत हे न्यायालय कार्यान्वित होईल, असा विश्वास महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे नवनिर्वाचित सदस्य अॅड. मिलिंद थोबडे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल माढा बार असोसिएशनच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माढा बार असोसिएशनचे अध्यक्ष रमेश खंदारे, उपाध्यक्ष रणजित परबत, सचिव संजय मासाळ यांच्यासह बारचे अनेक सदस्य उपस्थित होते.
अॅड. थोबडे यांनी आपल्या मनोगतात माढा तालुक्यातील वकिलांची दीर्घकालीन मागणी असलेल्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. न्यायालय सुरू झाल्यानंतर माढा परिसरातील नागरिकांना आणि विधिज्ञांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात विधिज्ञ सुरक्षा कायदा लागू करण्याबाबतही भाष्य केले. या संदर्भात मुख्यमंत्री यांनी वेळ दिली असून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
समारंभात माजी अध्यक्ष गणेश त्रिंबके, शशिकांत जगताप, आनंद कुलकर्णी, विजयकुमार आडकर, बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ प्रेमचंद संचेती आणि डी. आर. देसाई यांनी मनोगत व्यक्त करून अॅड. थोबडे यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. एन. के. तांबिले यांनी केले, तर आभार प्रदर्शन अॅड. कानडे यांनी मानले.

No comments:
Post a Comment