विधानपरिषद निवडणूक केवळ औपचारिकता; इगोपायी निवडणूक लादली गेली : पालकमंत्री जयकुमार गोरे
माढा (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजय निश्चित असून ही निवडणूक प्रत्यक्षात बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र काही नेत्यांच्या अहंकारामुळे आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखविण्याच्या प्रयत्नातून ही निवडणूक लादली गेली असल्याची टीका राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्याचा दौरा करून महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचाराचा धडाका लावला. यावेळी त्यांनी विविध लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले.
प्रारंभी त्यांनी प्रा. शिवाजीराव सावंत आणि जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर भाजप नेते रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची माढेश्वरी बँकेतील कार्यालयात बैठक घेण्यात आली.
बैठकीत बोलताना मंत्री गोरे म्हणाले की, "ही निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. अनेक लोकप्रतिनिधींचीही तीच भूमिका होती. मात्र काही व्यक्तींनी स्वतःचे महत्त्व निर्माण करण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी ही निवडणूक लावली. विनाशकाळी विपरीत बुद्धीप्रमाणे सध्या काही निर्णय घेतले जात आहेत. ज्यांना स्वतःच्या गावांसाठी आणि भागासाठी विकासकामे करता आली नाहीत, ती माणसे आता मतदारांना कोणता विश्वास देणार?"
त्यांनी पुढे दावा केला की, जिल्ह्यातील विरोधी विचारांचे अनेक लोकप्रतिनिधीही प्रत्यक्षात महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने असल्याची भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माढा तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री विशेष लक्ष देत असल्याचे सांगताना गोरे म्हणाले की, "प्रा. शिवाजीराव सावंत आणि रणजितसिंह शिंदे यांनी केलेल्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. आगामी काळातही तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामे मार्गी लावली जातील. त्यामुळे कोणताही गाफीलपणा न करता सर्वांनी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मतदान करावे."
यावेळी उमेदवार राजेंद्र राऊत यांनीही मतदार प्रतिनिधींशी संवाद साधला. माढा तालुक्याशी आपला जुना ऋणानुबंध असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.
दौऱ्यादरम्यान माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या मित्रप्रेम निवासस्थानी संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, नगराध्यक्षा मीनल साठे आणि साठे गटाच्या नगरसेवकांसमवेत बैठक झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उमेदवार राजेंद्र राऊत, प्रा. शिवाजीराव सावंत, रणजितसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शशिकांत देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, अशोक लुणावत यांच्यासह विविध नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात महायुतीकडे सुमारे ६८ टक्के मतदान असल्याचा दावा करत त्यांनी राजेंद्र राऊत यांचा विजय निश्चित असल्याचा पुनरुच्चार केला.
सध्या सोलापूर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशा परिस्थितीत महायुती आणि विरोधक यांच्यातील ही लढत केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरविणारी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
चौकट-1
बैठकीला बसू नका; विरोधकांचे आदरातिथ्य करा, पण राजकीय अंतर ठेवा
बैठकीदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विशेष सूचना दिल्या. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे उमेदवार आणि नेते मतदान मागण्यासाठी तुमच्याकडे येतील. त्यांचे आदरातिथ्य करा, चहा-पाणी द्या; मात्र त्यांच्या कोणत्याही राजकीय बैठकीत सहभागी होऊ नका. अशा गोष्टींमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. राजकारणात निष्ठा अत्यंत महत्त्वाची असते आणि ती जपली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
चौकट-2
पत्रकार परिषदेत जनता क्रॉकोच पार्टीवर निशाणा
दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री गोरे यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. दिल्लीतील जनता क्रॉकोच पार्टीच्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले.
ते म्हणाले की, "सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करण्याचा आणि युवकांच्या मनात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे संपूर्ण वावटळ सोशल मीडियाच्या माध्यमातून उभे करण्याचा पूर्वनियोजित डाव असल्याचे दिसून येते. या पक्षामागील खरे सूत्रधार वेगळे असून हे विरोधकांनी उभे केलेले छोटे रोप आहे."
देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना काही शक्ती फेक नॅरेटिव्ह तयार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र देशातील जनता अशा फेक नॅरेटिव्हला बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट-3
वडेट्टीवार व जानकरांवरही प्रतिक्रिया
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या परिवर्तनाच्या वक्तव्यावर भाष्य करताना गोरे म्हणाले, "विजय वडेट्टीवार यांनी परिवर्तनाची लाट आधी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अनुभवली आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य जनतेला फारसे गंभीरपणे घेण्याची गरज नाही."
आमदार उत्तम जानकर यांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, "मतदानाची पुरेशी संख्या नसताना निवडणूक लढविण्यात काहीही तथ्य नाही. आमदार उत्तम जानकर यांच्यासह अनेक आमदारांची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका होती. मात्र काहींच्या इगोमुळे ही निवडणूक लादली गेली."
No comments:
Post a Comment