माढा तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; आ. पाटील यांची जलसंपदा मंत्र्यांकडे धाव
माढा (कटूसत्य वृत्त) :- माढा तालुक्यात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोळेगाव धरणातून सीना नदीत तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार अभिजित पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनही सादर केले.
माढा विधानसभा मतदारसंघातील सीना नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीपात्रातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने परिसरातील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात घसरली आहे. परिणामी नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय शेती सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने पिकांवरही प्रतिकूल परिणाम होत असून, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सीना नदीत तातडीने पाणी सोडणे आवश्यक असल्याचे आ. पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी त्यांनी सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या अडचणींकडेही सरकारचे लक्ष वेधले. यापूर्वी पाणी सोडण्याच्या नियोजनातील त्रुटींमुळे सीना नदीला आलेल्या पुराचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला होता. अनेकांची शेती जमीन वाहून गेली, तर काहींच्या उपजीविकेची साधनेही नष्ट झाली होती. त्यामुळे भविष्यात पाणी सोडताना योग्य नियोजन करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणीही त्यांनी केली.
सीना नदीकाठच्या गावांतील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोळेगाव धरणातून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि शेतकरी व्यक्त करत आहे.

No comments:
Post a Comment