आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रा. डॉ. गोपाळ शिंदे यांची आंतरराष्ट्रीय मॅरथॉन स्पर्धेत उत्तम कामगिरी
जागतिक कीर्तीचा ’कॅाम्रेड् स अल्ट्रा मॅरेथॅान’ मध्ये आरोग्य विद्यापीठाच्या डॉ. गोपाळ शिंदे यांची ऐतिहासिक कामगिरी
नाशिक (कटूसत्य वृत्त):- दक्षिण आप्रिकेत पार पडलेल्या जगातील सर्वात जुन्या आणि धावपटूंसाठी कठीण असलेल्या ’कॅाम्रेड् स मॅरेथॅान २०२६’ (Comrades Marathon 2026) मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ’महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऑड रिसर्च’ येथील अस्थिरोग विभागाचे विभागप्रमूख डॉ. गोपाळ शिंदे यांनी डर्बन ते पीटरमॅरिट् झबर्ग यादरम्यानची ८६ किलोमीटर अंतराची आव्हानात्मक (Up Run) १२ तासात पुर्ण करावयाची धाव त्यांनी ११ तास २८ मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. गोपाळ शिंदे उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे, कुलसचिव राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या या जागतिक स्पर्धेत जगभरातून बावीस हजार पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी भारतातून २८९ धावपटू पात्र ठरले होते. या स्पर्धेत पात्र होण्यासाठी आदल्या वर्षी कोणत्याही जागतिक मान्यताप्राप्त मॅरेथॉनमध्ये पाच तासांपेक्षा कमी वेळात अंतर पार करणे बंधनकारक होते. डॉ. गोपाळ शिंदे, यांनी ’टाटा मुंबई मॅरेथॅान २०२६’ मध्ये ४ तास ३० मिनिटे आणि ६ सेकंद अशी उत्कृष्ट वेळ नोंदवून दक्षिण आप्रिकेच्या या जागतिक स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
यासाठी प्राध्यापक डॉ. गोपाळ शिंदे यांनी स्पर्धेची कौशल्यपूर्ण तयारी केली होती. विद्यापीठाची १० किमी मॅरेथॅान, हाफ मॅरेथॅान आणि त्यानंतर ५०, ५६ व ६५ किमीच्या अल्ट्रा मॅरेथॅान यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी आपला टप्पा गाठला. सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान दरमहा १५० ते २०० किमी, तर जानेवारी ते मे २०२६ दरम्यान दरमहा तब्बल ३०० किमी धावण्याचा सराव त्यांनी केला. रोज पहाटे त्यांनी हा सराव केला. धावण्यासोबतच दर आठवड्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग, सायकलिंग आणि पोहण्याचा सरावही त्यांनी सुरु ठेवला होता.
जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना डॉ. गोपाळ शिंदे यांनी सांगितले की, हा प्रवास खडतर होता, पण इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले. मला या संपूर्ण प्रवासात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि MPGIMER चे मोलाचे सहकार्य व पाठिंबा लाभला.
.jpeg)
No comments:
Post a Comment