भंगार चोरी अन् ११८ झाडांची कत्तल; मनपाची कारवाई अद्याप रखडली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेच्या गोदामातून भंगार चोरी प्रकरण तसेच खाजगी जागेवरील ११८ झाडांच्या बेकायदा कत्तलीच्या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दोन्ही गंभीर प्रकरणांमध्ये चौकशी व सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होऊनही अंतिम निर्णय प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने जप्त केलेल्या साहित्याची चोरी झाल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीने आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केल्यानंतर संबंधित १३ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांना ४८ तासांच्या आत आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते.
ही मुदत शनिवारी सायंकाळी संपुष्टात आली असली तरी सोमवारीही प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधितांवर नेमकी कोणती कारवाई होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शहरातील एका खाजगी जागेवरील तब्बल ११८ झाडांची बेकायदा तोड झाल्याचे प्रकरणही चर्चेत आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून जागा मालकाची ओळखही निष्पन्न झाली आहे. महापालिकेने संबंधित मालकाला नोटीस बजावून सुनावणी घेतली असली तरी अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.
याबाबत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याशी संपर्क साधला असता, "दोन्ही प्रकरणांमध्ये लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.
मात्र, गंभीर स्वरूपाच्या या दोन्ही प्रकरणांमध्ये कारवाईला होत असलेला विलंब पाहता महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
No comments:
Post a Comment