मगरवाडी-इचगाव रस्त्यासाठी ३३० कोटी मंजूर; आमदार राजू खरे यांची माहिती
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पालखीमार्ग राष्ट्रीय महामार्ग ९६५ अंतर्गत मगरवाडी ते इचगाव या राज्यमार्गाच्या मजबुतीकरणासाठी ३३० कोटी रुपयांच्या कामास मंजुरी मिळाल्याची माहिती मोहोळचे आमदार राजू खरे यांनी दिली. या रस्त्याच्या उभारणीमुळे मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांना दर्जेदार व सुरक्षित रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार असून या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे आमदार खरे यांनी सांगितले. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडेही या कामासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
या संदर्भात आमदार राजू खरे यांनी ४ जून रोजी पत्र देऊन एडीबी योजनेअंतर्गत या कामास मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यानुसार या मार्गासाठी ३३० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ९६५ अर्थात मोहोळ-आळंदी पालखी मार्गावरील हा रस्ता मोहोळ तालुक्यातील मगरवाडी येथून सुरू होऊन पंढरपूर तालुक्यातील तारापूर, विटे, पुळूज, पुळूजवाडी तसेच मोहोळ तालुक्यातील कोथाळे मार्गे इचगावपर्यंत जातो. राज्यमार्ग क्रमांक ३९४ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गाची एकूण लांबी ३३ किलोमीटर आहे.
या मार्गाच्या मजबुतीकरणामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून पालखी मार्ग आणि मंगळवेढा तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी महामार्गाला जोडणी मिळण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments:
Post a Comment