आश्रमशाळांतील शिक्षक भरती आता ‘पवित्र’ पोर्टलद्वारे; पारदर्शक प्रक्रियेला चालना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

आश्रमशाळांतील शिक्षक भरती आता ‘पवित्र’ पोर्टलद्वारे; पारदर्शक प्रक्रियेला चालना

 आश्रमशाळांतील शिक्षक भरती आता ‘पवित्र’ पोर्टलद्वारे; पारदर्शक प्रक्रियेला चालना

श्रीपूर (कटूसत्य वृत्त) :- राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गातील खासगी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया आता ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यासोबतच गुणवत्ताधारक शिक्षकांची निवड होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोनाली मुळे यांनी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून त्यामुळे भरती प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे.
या निर्णयांतर्गत विजाभज प्रवर्गातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व शाळांसाठी समान निकष लागू करण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेत सुसूत्रता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील समाजकल्याण, आदिवासी विकास व इतर बहुजन विकास विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमध्येही शिक्षक भरती होणार आहे. विशेषतः कला, क्रीडा आणि कार्यानुभव विषयांच्या शिक्षकांची मागणी अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटना व ‘पवित्र’ पोर्टल शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासोबतच हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages