नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त) :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करत लोकसभेतील भाजपचा प्रत्येक सहावा खासदार “घुसखोर” असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, निःपक्षपणे लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपला १४० पेक्षा जास्त जागा मिळू शकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी, आसाम आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर “मतचोरी” केल्याचा आरोप केला. भाजप कधी मतचोरी करून जागा जिंकते, तर कधी संपूर्ण सरकारच “चोरून” नेते, असा टोला त्यांनी लगावला.
लोकसभेत भाजपचे सध्या २४० खासदार असल्याचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, “ढोबळमानाने विचार केला तर भाजपचा प्रत्येक सहावा खासदार हा मतचोरी करून निवडून आला आहे. मग भाजपच्या भाषेत त्यांना ‘घुसखोर’ म्हणता येईल का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हरयाणा सरकारवर निशाणा साधताना त्यांनी “हरयाणातील संपूर्ण सरकारच घुसखोरांचे आहे,” अशी टीका केली. तसेच, “जे लोक संस्था खिशात ठेवतात आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करतात, ते स्वतःच रिमोट कंट्रोलवर चालणारे आहेत,” असा हल्लाबोलही त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी पुढे दावा केला की, “भाजपला खरी भीती सत्याची आहे. कारण जर देशात निःपक्ष निवडणुका झाल्या, तर भाजप १४० जागांच्या आसपासही पोहोचू शकणार नाही.”
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणुका “चोरल्या” गेल्याचा आरोप केला. बंगालमध्ये १०० हून अधिक जागांवर गैरप्रकार झाल्याचा दावाही त्यांनी केला.
यापूर्वीही राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने अशाच प्रकारचे डावपेच वापरल्याचा आरोप केला होता.
No comments:
Post a Comment