सर्व्हरच्या 'खो'मुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा; विद्यार्थी-पालक त्रस्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 26, 2026

सर्व्हरच्या 'खो'मुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा; विद्यार्थी-पालक त्रस्त

 सर्व्हरच्या 'खो'मुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा; विद्यार्थी-पालक त्रस्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दहावीचा निकाल यंदा लवकर जाहीर झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत आणि वेगाने पार पडेल, अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली होती. मात्र, ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दोन दिवसांत विद्यार्थ्यांचा उत्साह मावळल्याचे चित्र दिसून आले. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दिवसभर 'अंडर मेंटेनन्स'चा संदेश झळकत राहिल्याने विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अकरावी प्रवेशासाठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-१ फॉर्ममधील बदल तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी ऑनलाइन प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र, महाविद्यालय निवडीच्या टप्प्यावर वेबसाइट अचानक संथ झाली आणि काही वेळातच संपूर्ण प्रणाली ठप्प पडली. त्यानंतर स्क्रीनवर 'अंडर मेंटेनन्स'चा संदेश दिसू लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
दिवसभर सर्व्हर सुरळीत न झाल्याने अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. घरच्या संगणकावर किंवा मोबाइलवर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अनेकांनी रात्री उशिरा महा-ई-सेवा केंद्रे आणि सायबर कॅफेकडे धाव घेतली. शहरातील अनेक केंद्रांवर मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व्हरवरील ताण कमी झाल्यानंतर उशिरापर्यंत जागून पालकांनी फॉर्म भरून घेतले.
"दहावीचा निकाल लवकर जाहीर करून शिक्षण विभागाने चांगले काम केले. मात्र, ऑनलाइन यंत्रणा सक्षम नसेल तर विद्यार्थ्यांची अशी फरफट कशाला?" असा संतप्त सवाल पालकांतून उपस्थित केला जात आहे. दिवसभर प्रयत्न करूनही फॉर्म भरता आला नाही आणि शेवटी रात्री सायबर कॅफेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागली, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींची दखल घेत शिक्षण विभागाने महाविद्यालय पसंतीक्रम भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आता २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाविद्यालय निवडीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय, दहावीचा निकाल जाहीर होऊनही विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नसल्याने अंतिम प्रवेशावेळी आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच डिजिटल प्रणालीवर अवलंबून असलेल्या प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक अपयश पुन्हा एकदा समोर आले असून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी आणि पालकांची फरफट झाल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages