जकराया'च्या थकीत ऊस बिलासाठी धरणे आंदोलन
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील वटवट येथील जकराया शुगर या साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊस दरापैकी केवळ ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उर्वरित थकीत रक्कम १५ टक्के व्याजासह तात्काळ जमा करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख करत असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारण्यात आला आहे.
मोहोळ तालुक्यातील जकराया साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गाळप हंगामात गाळप गेलेल्या उसासाठी प्रतिटन १५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले होते. मात्र, उर्वरित ५० टक्के थकीत रक्कम प्रतिटन ३ हजार रुपये १५ टक्के व्याजासह जमा करणे अपेक्षित असताना कारखाना प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित कारखान्याला पत्रव्यवहाराद्वारे शेतकऱ्यांचे थकीत पैसे अदा करण्यास भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला.
यावेळी बिरू वाघमोडे, पिंटू पवार, दिगंबर कावळे, गणेश चवरे, बालाजी कदम, राजाभाऊ पवार, अभिमान गायकवाड, संभाजी माळी, सिद्राम वाघमोडे, नागेश बारबोले, शुभम तळेकर, पृथ्वीराज भोसले, उमेश माने, अनिल वसेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment