नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करा – पोलीस आयुक्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून सण साजरा करावा, कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये आणि अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले.
बकरी ईदच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, महानगरपालिका अधिकारी, शहर काजी, मुस्लिम धर्मगुरू, प्रमुख मस्जिदींचे विश्वस्त तसेच शहरातील प्रमुख ईदगाह मैदानांचे विश्वस्त उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त एम. राज कुमार बोलत होते.
बैठकीत सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्यावर भर देण्यात आला. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह संदेश, फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड न करता ते तातडीने हटवावेत, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले. बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी बकरी ईदच्या निमित्ताने येणाऱ्या विविध समस्या व सूचना मांडल्या.
बैठकीची प्रस्तावना करताना पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करू नये. अशा प्रकारची वाहतूक आढळल्यास पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. कोणत्याही खाजगी व्यक्तीने किंवा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून वाहने अडवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा उघड्यावर रक्त अथवा मांस पडणार नाही याची दक्षता घ्यावी. स्वच्छतेचे काटेकोर पालन करून दुर्गंधी आणि रोगराई पसरणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुन्हाण, पोलीस उपायुक्त प्रितम पावलकर, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, दिलीप पवार, सुधीर खिरडकर, राजन माने, नगर अभियंता सारिका आकुलवार, तपन डंके, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अग्निशामक दलाचे अधिकारी समीर पाटील तसेच विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment