खंडित वीजपुरवठ्यामुळे बार्शीतील उद्योग अडचणीत
बार्शी (कटूसत्य वृत्त):- एकीकडे बार्शी एमआयडीसी परिसरात नवीन उद्योग यावेत, रोजगारनिर्मिती वाढावी यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन प्रयत्नशील असताना दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या उद्योगांनाच महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या एमआयडीसी गाताची वाडी परिसरातील प्लास्टिक उद्योग चालकांनी शुक्रवारी आपल्या कामगारांसह थेट महावितरण कार्यालय गाठत तीव्र नाराजी व्यक्त केली.
गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित उद्योग परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उत्पादन प्रक्रियेवर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप उद्योग चालकांनी केला आहे. उत्पादन सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मशीनरी बंद पडते, उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात तसेच कच्च्या मालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.
यावेळी महिला कामगारांनीदेखील आपल्या अडचणी मांडल्या. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेकदा काम बंद ठेवावे लागते. काहीवेळा संपूर्ण दिवस कामकाज विस्कळीत होते, तर वेळेअभावी कामगारांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. त्यामुळे कामगारांच्या दैनंदिन उत्पन्नावर आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावरही परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने उद्योजकांचा संयम सुटू लागला आहे. यावेळी कामगार प्रतिनिधी राज ढोले आणि गजानन पवार यांनी समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. त्यांनी कार्यकारी अभियंता राकेश मगर यांना निवेदन देत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
"उद्योग टिकले तरच रोजगार टिकतील. अशा परिस्थितीत मूलभूत सुविधा सुरळीत राहणे गरजेचे आहे. यापुढे लोकप्रतिनिधींसमोरही हे गाऱ्हाणे मांडणार," असा इशारा उद्योजकांनी दिला. त्यामुळे आता महावितरण प्रशासन यावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे उद्योजक आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.
.png)
No comments:
Post a Comment